अभ्यासकांचा दावा; 32 वर्षांपासून शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा
महाराष्ट्र24 । यवतमाळ : कळंब शहराचा उल्लेख पुराणापासून आहे. याच कळंब शहरापासून काही अंतरावर असलेल्या दुर्गबंदीच्या जंगलाचा इतिहासही आता समोर येत आहे. कळंब येथे गोंडराजाचा किल्ला होता, तर दुर्गबंदी जंगलात राजाश्रय असलेले जगधामी मातांच्या मंदिराचा उल्लेख जुन्या पुस्तकांत आहे. यांचा संदर्भ घेऊन गेल्या 32 वर्षांपासून या ठिकाणचा अभ्यास करणारे काका चिलगलवार हे पाठपुरावा करीत आहेत. या ठिकाणी उत्खनन झाल्यास गोंडराजा व जगधामी (दुर्गा) मातेचे भव्यदिव्य मंदिर असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
दुर्गबंदी जंगलांशी संबंधित निवेदन माझ्याकडे आले होते. त्यावर संबंधित अधिकार्यांना अहवाल मागितला आहे. त्यानंतर पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करू. पुरात्वव विभागाच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. केशव वाबळे, उपवनसंरक्षक.
कळंबचा चिंतामणी इंद्रदेवाने स्थापिला असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे हा परिसर पुरातन व ऐतिहासिक असल्याचे अनेक संदर्भ वेगवेगळे ग्रंथ, इतिहासांच्या पुस्तकांत आहेत. कळंबजवळच असलेले निरंजन माहूर दतात्रयाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अशातच आता कळंबपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावरील वनविभागाच्या जोडमोहा रेंजमधील ‘दुर्गबंदी’चा इतिहास समोर येत आहे. वयाची 81 वर्षे गाठलेले व व्यवसायाने छायाचित्रकार असलेले काका चिलगलवार यांनी यासंदर्भातील अनेक मुद्दे समोर आणले आहेत. त्यांच्या मते, दुर्ग येथे गोंडराजाचा किल्ला होता.
गेल्या 32 वर्षांपासून या ठिकाणचा अभ्यास मी केला. अनेक संदर्भ शोधलेत. त्यात काही ऐतिहासिक पुस्तकांत संदर्भ सापडले आहेत. याचा पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन वनविभागाचे अधिकारी व पुरातत्त्व विभागाचे संचालक यांनी भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी देवस्थान असल्याचे मान्य केले. काम सुरू होण्याआधीच त्यांची बदली झाली. त्यामुळे पुढे काम झाले नाही. या ठिकाणी उत्खन्नन झाल्यास मोठा ऐतिहासिक ठेवा समोर येईल. काका चिलगरवार, अभ्यासक.
तो युद्धात पडला. कळंबवर मोगल सुलतांनानी आक्रमण केले. त्यात कत्तली, अत्याचार, लुटालूट करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. या ठिकाणी असलेले मात जगधामीचे शिल्पकलेने परिपूर्ण असलेले पीठ होते. ते उद्धस्त होऊ नये, म्हणून ते अत्यंत पद्धतशीरपणे मोठमोठ्या शिळांनी झाकण्यात आले. चंद्रपूरचा इतिहास या पुस्तकांत निरंजन माहूरजवळ दुर्गेचे देऊळ असल्याचा उल्लेख आहे. याशिवाय मोरेश्वर कुंठे लिखित दस्तऐवजात कळंबजवळ दुरुग आहे. येथे भवानीचे हेमांडपंथी मंदिर असल्याच्या नोंदी सापडतात. त्यामुळे अशा जागृत व ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणाचे उत्खनन व्हावे, अशी मागणी चिलगरवार यांनी केली आहे.
