Pradeep Rawat : बॉलिवूडवर शोककळा! ‘लगान’, ‘गजनी’ फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

 

‘लगान’ आणि ‘गजनी’ चित्रपटांमधील दमदार भूमिकांमुळे प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. ‘लगान’, ‘गजनी’, ‘सरफरोश’ आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. पी

प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय ‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारून केली होती. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.\

‘लगान’ चित्रपटातील त्यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना, "‘गजनी’ आणि ‘लगान’मधील देवा आता आपल्यात नाहीत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो," असे म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना अभिनेत्री रोशनी अचरेजा यांनीही प्रदीप रावत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘पत्थर के फूल’, ‘कोयला’, ‘संगदिल सनम’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

सन २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही मोठे कौतुक केले होते.

अभिनेते सोनू सूद यांनीही सोशल मीडियावर प्रदीप रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कृष्णधवल छायाचित्र शेअर करत त्यांनी, "प्रदीप रावत भाऊ, तुमची उणीव कायम जाणवत राहील," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रदीप रावत यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीने एक दमदार अभिनेता गमावला असून त्यांच्या भूमिका कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.

°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने