‘भाषा हे अर्थार्जनाचे प्रभावी साधन’ – डॉ. संध्या मोहिते पाटील


घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजमध्ये हिंदी सप्ताहाचा उत्साहात समारोप झाला. डॉ. संध्या मोहिते पाटील यांनी भाषा, साहित्य आणि डिजिटल माध्यमांतील रोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
घनसावंगी : मॉडेल कॉलेज, घनसावंगी येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनाचे औचित्य साधून १५ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हिंदी सप्ताहाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कवी, लेखिका, अनुवादक, अनाउन्सर, व्याख्यात्या डॉ. संध्या मोहिते पाटील प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संध्या मोहिते पाटील यांनी भाषा आणि आधुनिक रोजगाराच्या संधी यांचा संबंध स्पष्ट केला. त्या म्हणाल्या की, हिंदी भाषा देशातील विविध घटकांना एका सूत्रात जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. भाषा, साहित्य, संस्कृती आणि राष्ट्र यांचा परस्परांशी अतूट संबंध आहे. भाषा ही केवळ भावना व्यक्त करण्याचे माध्यम नसून सोशल मीडिया आणि डिजिटल युगात अर्थार्जनाचे प्रभावी साधन म्हणूनही तिचे महत्त्व वाढले आहे.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा दडलेली आहे. या प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मौलिक लेखन, गीतलेखन आणि काव्यलेखनाबरोबरच नियमित वाचन, चिंतन व मनन करण्याची सवय लावून घ्यावी. सातत्यपूर्ण सरावातून सर्जनशील लेखनाची क्षमता विकसित होऊन साहित्यनिर्मितीला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, गीत-संगीत आणि विविध डिजिटल माध्यमांमध्ये भाषाकौशल्य असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मौलिक लेखन आणि प्रभावी संवादकौशल्याच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही या क्षेत्रांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन डॉ. मोहिते पाटील यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आनंद देशमुख यांनी हिंदी भाषेच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. हिंदी ही राजभाषा असून तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेने देशातील विविध भाषिक आणि सांस्कृतिक घटकांना जोडण्याचे काम केले आहे. भाषा ही माणसांना परस्परांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांनी हिंदीसोबतच इतर भाषांचेही ज्ञान आत्मसात करून करिअरच्या विविध संधींचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान बासरीवादक श्री. योगेश पवार यांनी सादर केलेल्या सुमधुर बासरीवादनाने वातावरणात रंगत आणली. उपस्थितांनी त्यांच्या वादनाला उत्स्फूर्त दाद दिली. हिंदी सप्ताहाच्या कालावधीत काव्यलेखन, कथालेखन, निबंधलेखन, भित्तिपत्रक आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना समारोप कार्यक्रमात पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

रांगोळी स्पर्धेत अश्विनी उगले यांनी प्रथम, रूपाली गाडेकर यांनी द्वितीय, तर निकिता घायतडक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रोशनी उगले, चांदणी घायतडक आणि विशाखा घायतडक यांना विशेष प्रोत्साहन देण्यात आले. वैष्णवी जगताप, पूजा वाघ आणि वनिता पवार यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

निबंधलेखन स्पर्धेत साक्षी आनंदे, पायल मस्के आणि स्नेहा शिंदे यांनी, तर कविता लेखन स्पर्धेत रूपाली गाडेकर, अंजना घुंगासे आणि वनिता पवार यांनी प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळवले. भित्तिपत्रक स्पर्धेत पूजा मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. उमेश घुंगासे, आशिष थोरात आणि कुणाल गायकवाड यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला पत्रकार मुदसिर बेग आणि श्रीमती योगिता रथकर यांची उपस्थिती होती. विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. भीमराव पुंडगे, डॉ. ज्ञानेश्वर खोजे, प्रा. खंडू नवखंडे, बाळासाहेब वरखडे, प्रा. देशमुख आणि डॉ. ऋषीबाबा शिंदे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख डॉ. कन्नूलाल विटोरे यांनी केले. डॉ. जया बागुल यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

______




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने