डीजेच्या दणदणाटावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल, उद्या तातडीची सुनावणी

 


मुंबई हायकोर्टाने सण-उत्सवांतील ध्वनीप्रदूषणाची सुमोटो दखल घेतली आहे. डीजेच्या आवाजाबाबत नियमांची अंमलबजावणी आणि कारवाईचा अहवाल सरकारकडून मागवण्यात आला असून २२ सप्टेंबरला तातडीची सुनावणी होणार आहे.

मुंबई : सण-उत्सवांच्या काळात डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वाढत्या आवाजामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सुमोटो दखल घेतली असून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी आणि त्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकरणावर २२ सप्टेंबर रोजी तातडीची सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सण-उत्सव साजरे करण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करताना न्यायालयाने उत्सवांमुळे इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे आणि ध्वनिक्षेपकांवर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या साऊंड सिस्टीमविरोधात कारवाई करताना संबंधित उपकरणे जप्त करून नियमभंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हे निर्देश वर्षभरात होणाऱ्या विविध धर्मांच्या मिरवणुका आणि उत्सवांनाही लागू राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठानेही क्षमतेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या डीजेंवर निर्बंध घातले असून १ नोव्हेंबरपर्यंत याबाबत आदेश लागू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सवांच्या काळात डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, डीजेबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे. डीजेवरील निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी डीजे व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असतानाच जिल्ह्यात विविध ठिकाणी नियमभंग करणाऱ्या डीजे व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे.

शेवगाव येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान साऊंड सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन झाले असेल तर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कार्यक्रमातील आवाजाची मर्यादा निर्धारित निकषांपेक्षा अधिक असल्याचे आढळल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सण आणि उत्सवांच्या काळातील ध्वनीप्रदूषणासह रहदारीला होणाऱ्या अडथळ्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांत ठळकपणे मांडला होता. त्यांच्या भूमिकेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या समर्थनार्थ पुण्यात नागरिकांचा मोर्चाही काढण्यात आला होता.

नागपूरमध्येही डीजेच्या वापराबाबत प्रशासनाची भूमिका चर्चेत आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजेबाबत निर्बंधांची भूमिका जाहीर केली होती. आता मुंबई हायकोर्टाने ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे आगामी सण-उत्सवांमध्ये डीजेच्या वापराबाबत प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

________





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने