राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला नवा पेच! शरद पवार एनडीएमध्ये जाणार? राजकीय चर्चांना वेग

 





राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. शरद पवार गटाकडून स्वतंत्रपणे एनडीएमध्ये सहभागी होण्याची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती.





मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार की स्वतंत्र राजकीय वाटचाल कायम ठेवणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विलीनीकरणाऐवजी स्वतंत्र पक्ष म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदारांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या संवादादरम्यान प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण करावे की नाही, भविष्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आमदारांची भूमिका काय असेल आणि संभाव्य राजकीय निर्णयांना त्यांचा पाठिंबा असेल का, याबाबत मते जाणून घेतली जात असल्याची माहिती आहे.




दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीतील विधानामुळे नवे वळण मिळाले आहे. 'माझा भाऊ गेला, तेव्हाच विलीनीकरणाची चर्चा संपली,' अशा आशयाची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडल्याचे वृत्त आहे. या विधानानंतर दोन्ही पक्षांमधील विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाकडून स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवून सत्तेत सहभागी होण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याची चर्चा आहे.





 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये स्वतंत्र घटकपक्ष म्हणून सहभागी होऊ शकतो का, याची पडताळणी सुरू असल्याचे समजते. असा निर्णय झाल्यास संबंधित पक्षाला केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रिपद तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण करण्यापेक्षा शरद पवार यांच्या पक्षाला स्वतंत्र घटकपक्ष म्हणून सोबत घेण्याबाबत अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांकडून सकारात्मक भूमिका असल्याची माहितीही समोर आली आहे.





या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास भविष्यात पक्षाच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वासमोर आव्हान निर्माण होऊ शकते, अशी चिंता त्यांच्या गटाकडून व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण सध्या मान्य नसले, तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने स्वतंत्र घटकपक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध नसल्याची भूमिका महायुतीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती आहे.




एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे स्वतंत्र राजकीय वाटचाल आणि सत्तेतील सहभागाचा पर्याय चर्चेत आला आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, एनडीएमधील संभाव्य प्रवेश, विलीनीकरणाबाबतची भूमिका आणि मंत्रिमंडळातील सहभाग या सर्व बाबी सध्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चर्चेच्या स्तरावर आहेत. संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होईपर्यंत या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


__________



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने