Music Program : आशाताईंच्या बहुरंगी सुरांची अविस्मरणीय मैफल; ‘आशा एक आवाज’ला उत्स्फूर्त दाद



आशा भोसले यांच्या बहुरंगी गायकीला मानवंदना देणारा ‘आशा एक आवाज, रंग अनेक’ संगीत कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात पार पडला.

छत्रपती संभाजीनगर :  आशा भोसले यांच्या अष्टपैलू आणि बहुरंगी गायकीला गीतांच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देणारा ‘आशा एक आवाज, रंग अनेक’ हा विशेष संगीत कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरेल वातावरणात पार पडला. सरगम म्युझिकोलॉजी आणि नादरंग यांच्या संयुक्त विद्यमाने पी दिशा संस्कृतीजवळील हॅपी होम येथील सरगम म्युझिकोलॉजीच्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध भावछटा, भाषा आणि संगीतप्रकारांनी नटलेल्या या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर सुनीता गर्गे आणि अनिरुद्ध वरणगांवकर यांनी ‘तोरा मन दर्पण कहलाए’ हे भक्तिगीत सादर करून वातावरण भक्तिरसाने भारून टाकले. डॉ. संध्या मोहिते यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत आशा भोसले यांच्या प्रदीर्घ संगीतप्रवासातील विविध टप्पे, त्यांच्या आवाजाची वैशिष्ट्ये आणि गीतांशी संबंधित रंजक संदर्भ रसिकांसमोर उलगडले. कार्यक्रमात रबिन आणि सुजाता यांनी ‘क्या देखते हो’, मीना मॅडम यांनी ‘सलोना सा साजन’, डॉ. सारिका यांनी ‘ये रातें ये मौसम’ आणि स्वाती जहागिरदार यांनी ‘रुपेरी वाळूत’ ही गीते सादर केली. रत्ना आणि अनिरुद्ध दा यांच्या ‘अच्छा जी मैं हारी’ या सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. दीपिका यांच्या ‘दो लफ्जों की है’ आणि विलास सर यांच्या ‘चुरा लिया है तुमने’ या गीतांनी मैफलीत रोमँटिक रंग भरला.


डॉ. अंजली देशपांडे आणि रत्नमाला शिंदे यांनी ‘कजरा मोहब्बत वाला’ या जोशपूर्ण गीतातून रंगत वाढवली, तर राधिका यांनी ‘ये मेरा दिल’ सादर केले. सुजाता यांनी ओडिया भाषेतील गीत सादर करून आशा भोसले यांनी विविध भारतीय भाषांमध्ये केलेल्या गायनाचा आवाका अधोरेखित केला. प्रज्ञा आणि अनिरुद्ध यांनी ‘लेकर हम दीवाना दिल’, तर रॉबिन आणि सुजाता यांनी ‘आवाज दी है’ सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. आशा भोसले यांच्या गायकीतील भाषिक आणि सांगीतिक वैविध्य हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा पैलू ठरला. भालचंद्र पैठणे आणि सुजाता सामल यांनी ‘संसार है इक नदिया’, तर स्वाती जहागिरदार आणि अनिरुद्ध दा यांनी ‘हाल कैसा है जनाब का’ सादर केले. सुजाता आणि अनिरुद्ध दा यांनी बंगाली गीत सादर करून कार्यक्रमाला आणखी एक वेगळी रंगत दिली.


गणेश देशपांडे आणि एसीपी अनिल गायकवाड यांची विशेष उपस्थितीही कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. दोघांनी आपल्या आवडत्या गीतांचे सादरीकरण करत रसिकांशी सुरेल संवाद साधला. अनिरुद्ध दा यांनी आशा भोसले यांच्या मूळ आवाजासोबत केलेले सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले. मूळ आवाजातील गाणे आणि प्रत्यक्ष रंगमंचीय सादरीकरण यांचा हा अनोखा मिलाफ रसिकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला. या कार्यक्रमाची संकल्पना सुजाता सामल यांची होती. आयोजनाची जबाबदारी सुजाता सामल, रॉबिन सामल आणि नादरंगचे अमोल कोरडे यांनी सांभाळली. अमोल कोरडे यांनी ‘चंद्र आहे साक्षीला’ हे गीत सादर करून मैफलीत आणखी एक सुरेल रंग भरला. सुरजकुमार राठोड आणि प्रज्ञा वानखेडे या युवा गायकांच्या दमदार आवाजानेही सभागृह मंत्रमुग्ध झाले.


आशा भोसले यांच्या गायकीतील शास्त्रीयतेपासून लोकप्रियतेपर्यंतचा प्रवास, हिंदीसह विविध भारतीय भाषांतील गीते, तसेच प्रेम, भक्ती, विरह आणि खट्याळपणा अशा विविध भावछटांचा आविष्कार या कार्यक्रमातून झाला. कलाकारांचे सुरेल सादरीकरण, गीतांमागील संदर्भ उलगडणारे निवेदन आणि स्टुडिओतील जिव्हाळ्याचे वातावरण यामुळे ‘आशा एक आवाज, रंग अनेक’ ही मैफल रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली. आशाताईंचा आवाज एकच; मात्र त्या आवाजातील भाव, लय आणि रंग असंख्य आहेत. याच असंख्य रंगांची सुरेल उधळण या मैफलीत अनुभवायला मिळाली.

______





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने