तुकाराम मुंढेंचा सोशल मीडियावर ‘डंका’ फडणवीस- शिंदेंनाही टाकलं मागे !

 

तुकाराम मुंढेंनी इन्स्टाग्राम लोकप्रियतेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मागे टाकलं. कमी पोस्ट्स असूनही एंगेजमेंट रेट तब्बल २०.३५ टक्के.

मुंबई : आपल्या कडक शिस्तीच्या आणि बेधडक प्रशासकीय कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आता सोशल मीडियावरही चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. प्रशासनातील धडाकेबाज कारवायांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली त्यांची लोकप्रियता इन्स्टाग्रामवरही दिसून येत आहे. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि एंगेजमेंट रेटच्या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मागे टाकल्याचे ऑगस्ट २०२६ मधील आकडेवारीतून समोर आले आहे.

ऑगस्ट २०२६ मध्ये उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, तुकाराम मुंढे यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर सुमारे ३४.१५ लाख फॉलोअर्स आहेत. त्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुमारे २९.०२ लाख, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुमारे १३.०१ लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे फॉलोअर्सच्या संख्येत मुंढे या दोन्ही प्रमुख राजकीय नेत्यांपेक्षा पुढे असल्याचे चित्र आहे. मात्र, केवळ फॉलोअर्सची संख्या त्यांच्या लोकप्रियतेचे पूर्ण चित्र स्पष्ट करत नाही. त्यांच्या पोस्टवर नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद अधिक लक्षवेधी आहे. तुकाराम मुंढे यांच्या इन्स्टाग्राम खात्याचा एंगेजमेंट रेट तब्बल २०.३५ टक्के असल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांचा एंगेजमेंट रेट सुमारे ०.५० टक्के, तर एकनाथ शिंदे यांचा ०.२४ टक्के आहे. या तुलनेत मुंढेंच्या पोस्टना मिळणारा प्रतिसाद किती मोठा आहे, हे स्पष्ट होते.

विशेष म्हणजे हा प्रतिसाद मिळवण्यासाठी मुंढेंना सातत्याने पोस्ट करण्याची गरजही पडलेली नाही. गेल्या ६० दिवसांत त्यांनी केवळ १३ पोस्ट केल्या. याच कालावधीत देवेंद्र फडणवीस यांनी ९७, तर एकनाथ शिंदे यांनी २५ पोस्ट केल्या. कमी पोस्ट करूनही मुंढेंच्या खात्यावरील एंगेजमेंट लक्षणीयरीत्या अधिक आहे.

 तुकाराम मुंढे यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेमागे त्यांच्या प्रशासकीय कामाची शैली महत्त्वाची ठरत असल्याचे दिसते. अन्नसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करताना त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे व्हिडीओ आणि चित्रफिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.

रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात अचानक पाहणी करणे, अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणे, अस्वच्छता शोधणे, अन्नसाठ्याची पाहणी करणे आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास तत्काळ कारवाई करणे, अशा प्रकारचे व्हिडीओ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची ‘कडक आणि नियमप्रिय अधिकारी’ अशी प्रतिमा अधिक ठळक झाली आहे. तुकाराम हरीभाऊ मुंढे हे २००५ च्या महाराष्ट्र कॅडरमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. मे २०२६ पासून ते महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अन्न भेसळ, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईला वेग आला. त्यांच्या नेतृत्वाखाली तीन हजारांहून अधिक छापे टाकण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांवर तात्पुरती बंदी घालण्यापासून परवाने निलंबित करण्यापर्यंतची कारवाई करण्यात आली.

तुकाराम मुंढेंची सोशल मीडिया लोकप्रियता केवळ राजकीय नेत्यांशी केलेल्या तुलनेपुरती मर्यादित नाही. प्रशासकीय आणि पोलीस सेवेत आपल्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेल्या समीर वानखेडे आणि विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी तुलना केली असता, डिजिटल लोकप्रियतेच्या बाबतीत मुंढे आघाडीवर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंढेंच्या पोस्टना मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या प्रशासकीय प्रतिमेशी जोडलेला दिसतो. नियमांची काटेकोर अंमलबजावणी, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी आणि कारवाई करताना कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका यामुळे त्यांच्या कामाचे व्हिडीओ नागरिकांमध्ये वेगाने पसरतात. अनेक जण हे व्हिडीओ पुढे प्रसारित करत असल्याने त्यांच्या सोशल मीडिया पोहोचीतही वाढ होत आहे.

सोशल मीडियाच्या युगात लोकप्रियतेसाठी सातत्याने पोस्ट करणे महत्त्वाचे मानले जाते. मात्र, तुकाराम मुंढेंच्या बाबतीत चित्र काहीसे वेगळे आहे. अवघ्या १३ पोस्ट्स आणि ६० दिवसांच्या कालावधीत २० टक्क्यांहून अधिक एंगेजमेंट रेट ही बाब विशेष लक्षवेधी ठरते. फॉलोअर्सची संख्या, पोस्टवरील नागरिकांचा प्रतिसाद आणि त्यांच्या कारवाईच्या चित्रफितींना मिळणारी मोठी पोहोच या सर्वांचा विचार करता तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता केवळ प्रशासकीय वर्तुळापुरती राहिलेली नाही. त्यांच्या कामाची प्रतिमा आता डिजिटल विश्वातही प्रभाव निर्माण करत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

_______

 


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने