OpenAI : AI मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती मुख्य शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा !

 

ओपनएआयचे मुख्य शास्त्रज्ञ याकुब पाचोकी यांनी AIच्या वेगवान प्रगतीवर चिंता व्यक्त केली आहे. AI स्वतःच्या क्षमतांमध्ये सुधारणा करू शकते, असा इशारा देत त्यांनी सुरक्षिततेसाठी जागतिक समन्वयाची गरज अधोरेखित केली.

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे संपूर्ण जगासमोर नव्या संधींसोबतच गंभीर धोकेही उभे राहत आहेत. ओपनएआयचे मुख्य शास्त्रज्ञ याकुब पाचोकी यांनी ‘अ‍ॅन एलियन माइंड’ या लेखातून AIच्या भविष्यातील क्षमतांबाबत महत्त्वाची चिंता व्यक्त केली आहे. सध्याच्या वेगाने AIचा विकास सुरू राहिल्यास भविष्यात काही प्रणाली स्वतःच्या विकास प्रक्रियेलाच गती देऊ शकतात, असा त्यांचा अंदाज आहे. 

पाचोकी यांच्या मते, गेल्या काही वर्षांत तर्कशक्तीवर आधारित AI प्रणालींच्या क्षमतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आजची AI केवळ मजकूर किंवा चित्र तयार करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती संगणक आणि डिजिटल इंटरफेस हाताळू शकते, माणसांसोबत तसेच इतर AI प्रणालींसोबत काम करू शकते आणि वैज्ञानिक संशोधनासारखी गुंतागुंतीची कामेही पार पाडू शकते. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातही या क्षमतांमुळे नवीन शक्यता निर्माण होत असताना त्याचवेळी नवीन धोकेही निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

AIची वाढती क्षमता समजून घेणेही तितकेच आव्हानात्मक ठरत असल्याचे पाचोकी यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणावर संगणकीय शक्ती आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून AI प्रणाली विकसित होत असल्या, तरी त्यांच्या अंतर्गत कार्यपद्धतीतील प्रत्येक बाब मानवाला पूर्णपणे समजतेच असे नाही. त्यामुळे AI अधिक सक्षम होत असताना त्याच्या वर्तनाचा अंदाज घेणे आणि त्यावर प्रभावीपणे देखरेख ठेवणे अधिक कठीण होऊ शकते. 

यातील सर्वात महत्त्वाची चिंता म्हणजे ‘रिकर्सिव्ह सेल्फ-इम्प्रूव्हमेंट’ अर्थात RSI. या प्रक्रियेत AI प्रणाली स्वतःच्या विकासासाठी आवश्यक संशोधन आणि सुधारणा करण्यात वाढत्या प्रमाणात सहभागी होऊ शकतात. पाचोकी यांनी ओपनएआयमधील काही अंतर्गत निष्कर्षांच्या आधारे AIच्या प्रगतीचा सध्याचा वेग भविष्यात RSIपर्यंत पोहोचू शकतो, अशी ठाम शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत AIच्या क्षमतांमध्ये आणखी मोठ्या झेप पाहायला मिळू शकतात. 

मात्र, AI मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाणारच आहे, असे पाचोकी यांनी निश्चितपणे म्हटलेले नाही. उलट, अशा संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सध्या अधिक सावधगिरीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही AI प्रयोगशाळेने AIची सुरक्षितता आणि त्याच्या वर्तनावर देखरेख ठेवण्याच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण केलेले नाही. त्यामुळे AIचा विकास कमाल वेगाने सुरू ठेवणे कितपत जबाबदारपणाचे आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. 

पाचोकी यांनी AIच्या विकासाचा वेग काही प्रमाणात स्वेच्छेने कमी करण्याची भूमिका मांडली आहे. तसेच AIच्या सुरक्षिततेसाठी समान निकष निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्रयस्थ लेखापरीक्षक, सरकारी संस्था किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. भविष्यातील AI विकासासाठी विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय समन्वय निर्माण करणे हे सरकारांसाठी प्राधान्याचे काम असावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

AIमुळे मानवाच्या अनेक कामांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता असताना, या तंत्रज्ञानाच्या विकासात मानवाचे नियंत्रण आणि मानवी हितसंबंध केंद्रस्थानी राहणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘AI मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाणार का?’ हा प्रश्न सध्या निश्चित उत्तरापेक्षा अधिक गंभीर चर्चेचा विषय बनला आहे. याकुब पाचोकी यांच्या इशाऱ्यामुळे AIच्या वेगवान प्रगतीसोबतच त्याच्या सुरक्षिततेवरही तितकाच भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 

______






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने