बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला तुरुंगात पाठवणाऱ्या तरुणीने दुसऱ्याच दिवशी त्याच तरुणाशी लग्न करण्याचा हट्ट धरला. नकार मिळाल्यानंतर तिने फिनाइल प्राशन केल्याची धक्कादायक घटना गोरखपूर येथे घडली.
गोरखपूर: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गोंधळात टाकणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत एका तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.
मात्र, दुसऱ्याच दिवशी तीच तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तुरुंगात असलेल्या त्या तरुणाला बोलावून त्याच्याशी लग्न लावून देण्याची मागणी करू लागली. पोलिसांनी तिला संबंधित आरोपी जिल्हा कारागृहात असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात बोलावणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भेटायचे असल्यास कारागृहाच्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अशी माहिती दिली.
यावरही तरुणी ठाम राहिली. काही वेळानंतर ती पोलीस ठाण्याबाहेर गेली आणि आपल्या पर्समधून फिनाइलची बाटली काढून ते प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तातडीने तिला उपचारासाठी चौरी चौरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांना कळवले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, संबंधित तरुणीने गुन्ह्यातील आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावण्याचा आग्रह धरला होता. मात्र आरोपी न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा कारागृहात असल्याने ते शक्य नसल्याचे तिला सांगण्यात आले. त्यानंतर तिने फिनाइल प्राशन केल्याची माहिती मिळाली. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, एका दिवसात घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकेमुळे पोलिसांसह स्थानिक नागरिकही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
°°°°°
