प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचे नितीन गडकरींवर निशाणा !

 

 धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तिरंगा मोर्चात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर जोरदार टीका केली. इथेनॉल धोरणासह केंद्र सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

मुंबई: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तिरंगा मोर्चात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका करत आगामी काळात विरोधकांचे लक्ष्य कोण असू शकते, याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तिरंगा मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नितीन गडकरी यांचा उल्लेख "खड्डामंत्री" असा केला. त्यानंतर "माफ करा, मी चुकलो, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी," असे म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावला. यानंतर त्यांनी इथेनॉल धोरणाचा उल्लेख करत, "हा पुढचा विषय नक्की आहे," असे विधान केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही टीका केली. त्यांच्या भाषणातून केंद्र सरकारच्या काही महत्त्वाच्या मंत्र्यांवर आगामी काळात विरोधक अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकतात, असे राजकीय संकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अलीकडच्या काळात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावरून देशभरात मोठी चर्चा झाली होती. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी काही वाहनधारकांकडून करण्यात आल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना नितीन गडकरी यांनी इथेनॉलविरहित शुद्ध पेट्रोल हवे असल्यास त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी तसेच सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

याशिवाय, भविष्यात डिझेलमध्ये आइसोब्युटेनॉलचा वापर वाढविण्याच्या संभाव्य योजनेबाबतही चर्चा सुरू आहे. इथेनॉल धोरण आणि पर्यायी इंधनाच्या वापरावरून केंद्र सरकारची भूमिका आगामी काळातही राजकीय वादाचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर अधिक आक्रमक भूमिका घेतली असून, विविध धोरणांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांच्यावरील टीका आणि इथेनॉल धोरणावरील वाद आगामी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.

°°°°




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने