Bhujbal Vs Tatkare : भुजबळ-तटकरे आमनेसामने? टोलेबाजीची चर्चा !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या भाषणांची जोरदार चर्चा रंगली. भुजबळांनी तटकरेंना टोला लगावत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, तर तटकरेंनीही राजकीय संकेत देत रोहित पवारांना आव्हान दिले.

 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वापासून ते जुन्या राजकीय निर्णयांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र या कार्यक्रमात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाषणांनी. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमधून अप्रत्यक्ष टोलेबाजी दिसून आल्याने पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचीही चर्चा रंगली.

सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळ यांची तुलना कबड्डीपटूशी करत त्यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक केले. खोलवर चढाई करून बोनस गुण मिळवणे किंवा एकाच वेळी अनेकांना बाद करणे, हे भुजबळांना चांगलेच अवगत असल्याचे सांगत त्यांनी मिश्किल शैलीत भाष्य केले. तसेच प्रफुल पटेल यांची फुटबॉलपटू, तर हसन मुश्रीफ यांची कुस्तीपटू म्हणून तुलना करत अजित पवारांनी उभी केलेली ही टीम भविष्यातही यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

तटकरे यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना छगन भुजबळ यांनीही व्यासपीठावरून सूचक टोला लगावला. "खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका," असे म्हणत त्यांनी पक्षातील ऐक्य आणि संघटनशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. पक्षापेक्षा कुणीही मोठा नसतो, पक्ष हा केवळ झेंडा नसून लाखो कार्यकर्त्यांचा विश्वास असतो, असे ते म्हणाले.

यावेळी भुजबळ यांनी पक्षातील निष्ठेबाबतही महत्त्वाचे विधान केले. अजित पवार यांच्याप्रती ज्या निष्ठेने कार्यकर्त्यांनी काम केले, तीच निष्ठा आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी वाहण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. कोणतेही पद हे कायमस्वरूपी नसते, ते आळवावरच्या पाण्यासारखे कधीही निसटू शकते, त्यामुळे पक्ष बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आपल्या भाषणात भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच्या आठवणींनाही उजाळा दिला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1999 मध्ये पक्षाची स्थापना कशी झाली, त्या काळातील संघर्ष, काँग्रेसमधून बाहेर पडताना आलेल्या अडचणी आणि स्वतःला मिळालेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर नाकारल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांसाठी आपण शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिलो होतो, असेही त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे सुनील तटकरे यांनी 2019 च्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या प्रस्तावावर सर्व आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असा दावा केला. त्या पत्रावर पहिली सही कुणाची होती, याचा शोध घेण्याची वेळ आता आली असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे रोहित पवार आणि शरद पवार गटावर निशाणा साधला.

तटकरे यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. जर त्या काळात मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवले असते, तर आज पक्षाची राजकीय स्थिती वेगळी असती, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच 'लाडकी बहीण' योजनेसारख्या निर्णयांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा पक्षाच्या संघटनात्मक बळकटीचा संदेश देणारा असला, तरी भुजबळ आणि तटकरे यांच्या भाषणांमधील टोलेबाजी, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचा उल्लेख आणि 2019 च्या राजकीय घटनांवरील दावे यामुळे या कार्यक्रमाची राजकीय चर्चा अधिक रंगली. त्यामुळे आगामी काळात पक्षातील समीकरणे आणि नेतृत्वाच्या भूमिकांबाबत नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने