Fraud : खळबळजनक.. केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या नियुक्तीचे आमिष; 20 कोटीच्या व्यवहाराचा पर्दाफाश !


केंद्रीय महामंडळावर राज्यमंत्री दर्जाची नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवत 20 कोटी 25 लाखांची मागणी करणाऱ्या तिघांना यवतमाळमध्ये अटक करण्यात आली.

यवतमाळ : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळांवर राज्यमंत्री दर्जाच्या नियुक्त्या मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 20 कोटी 25 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या कथित ठगांच्या टोळीचा यवतमाळमध्ये पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

लौकिक जगन्नाथ फुलकर, विश्वजित सुरेश राठोड आणि गणेश लालसिंग राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून केंद्रीय महामंडळांवरील नियुक्त्यांच्या नावाखाली मोठा आर्थिक व्यवहार घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 16 मे रोजी लौकिक फुलकर याने मोबाईल संदेशाद्वारे नितीन भुतडा यांच्याशी संपर्क साधला. त्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 42 महामंडळांची यादी पाठवत त्यापैकी पसंतीच्या तीन महामंडळांची निवड करण्यास सांगितले. याचबरोबर नियुक्तीची व्यवस्था करणारी व्यक्ती म्हणून गणेश राठोड याचे नाव आणि संपर्क क्रमांकही देण्यात आला होता.

यानंतर आरोपींनी संबंधित पदासाठी एकूण 20 कोटी 25 लाख रुपये खर्च येईल, असा दावा केला. तसेच व्यवहार निश्चित करण्यासाठी एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम टोकन म्हणून आगाऊ जमा करण्याची अट घातली होती. टोकन रक्कम दिल्लीत पोहोचल्यानंतर काही दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि निवडीबाबत थेट दिल्लीहून संपर्क साधला जाईल, अशी बतावणी करण्यात आली होती.

या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाल्यानंतर नितीन भुतडा यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने संपूर्ण प्रकरण उघड करण्यासाठी स्टिंग ऑपरेशनची योजना आखण्यात आली.

ठरलेल्या योजनेनुसार 30 मे रोजी सकाळी माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयात आरोपींना बोलावण्यात आले. टोकन रक्कम देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅगेत रद्दी कागद भरून वरच्या बाजूला 50 हजार रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवण्यात आले होते. त्यामुळे बॅगेत मोठी रोख रक्कम असल्याचा आभास निर्माण करण्यात आला.

ठरल्याप्रमाणे विश्वजित राठोड आणि गणेश राठोड हे संपर्क कार्यालयात पोहोचले. त्यांनी टोकन रकमेची बॅग ताब्यात घेताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर तपासाच्या आधारे तिसरा आरोपी लौकिक फुलकर यालाही अटक करण्यात आली.

या कारवाईनंतर केंद्रीय महामंडळांवरील नियुक्त्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींनी यापूर्वीही अशाच पद्धतीने इतर व्यक्तींना गंडा घातला आहे का, त्यांच्या मागे आणखी कोणी सूत्रधार आहेत का आणि या रॅकेटचे इतर राज्यांशी काही संबंध आहेत का, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी किंवा केंद्रीय संस्थांमधील नियुक्त्यांच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारच्या संशयास्पद प्रस्तावांची तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

अवधूतवाडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत असून या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


°°°°°





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने