मुंबईसह 29 महापालिकांचा संपूर्ण निकाल जाहीर झाला आहे. यात 19 ठिकाणी भाजपची सरळ सत्ता आली. ठाकरेंचा बालेकिल्ला मात्र कोसळला.
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर आता महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांतही भाजपने जोरदार मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निकालातून भाजप हा सर्वात मोठा विजेता ठरला असून मुंबईसह तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजप किंवा भाजप आघाडीची सत्ता स्पष्ट झाली आहे. सर्वात मोठा धक्का ठाकरे गटाला बसला असून तब्बल 25 वर्षांची एकहाती सत्ता असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीने काबीज केली आहे.
मुंबईत भाजपाने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून राज ठाकरे यांच्या मनसेसह ठाकरे बंधूंना एकूण 71 जागांवर यश मिळाले आहे. मात्र बहुमतापासून ते दूर राहिल्याने मुंबईचा पुढील महापौर हा महायुतीचाच असणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यामुळे यंदाची मुंबईची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आणि ऐतिहासिक ठरली.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. नागपूरमध्ये भाजपाने आपला गड अबाधित ठेवत पुन्हा सत्ता कायम राखली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाच्या प्रभावाला छेद देत भाजपाने सत्ता खेचून आणली आहे. नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा, जालना, इचलकरंजी, पनवेल अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप किंवा भाजप आघाडी आघाडीवर आहे.
मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात आली होती. बहुतांश प्रभाग चार सदस्यीय असून काही प्रभाग तीन किंवा पाच सदस्यीय होते. मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिले असता मुंबईत 52.94 टक्के, ठाण्यात 56 टक्के, पुण्यात 52 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिकमध्ये 57 टक्के मतदान झाले. मराठवाड्यात परभणीत 66 टक्के तर जालन्यात 61 टक्के मतदानाची नोंद झाली.
निकालांनुसार बृहन्मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गट आघाडीवर आहे. भिवंडी-निजामपूरमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. नागपूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अकोला, नांदेड-वाघाळा, मीरा-भाईंदर, धुळे, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी, जालना आणि परभणीत विविध ठिकाणी भाजप किंवा भाजप आघाड्यांची सत्ता स्थापन होणार आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी, लातूरमध्ये काँग्रेस-वंचित आघाडी, उल्हासनगरमध्ये इस्लाम पक्ष-एमआयएम आघाडी, तर परभणीत ठाकरे-काँग्रेस आघाडी सत्तेत येणार आहे.
एकूणच या निकालांमधून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता पुढील काही दिवसांत महापौर निवडीच्या हालचालींना वेग येणार असून, कोणत्या शहराचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
---------------------------------
