राष्ट्रसेविकांच्या घोषवादनातून शिस्त, साधना आणि राष्ट्रप्रेमाचा निनाद; ‘नवति स्वर वादिनी’ कार्यक्रम उत्साहात


जालना : राष्ट्र सेविका समिती या अखिल भारतीय महिलांच्या संघटनेच्या ९०व्या वर्धापनदिनानिमित्त देवगिरी प्रांतातील संभाजीनगर विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “नवति स्वर वादिनी” हा विशेष घोषवादन कार्यक्रम दानकुँवर महिला महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संभाजीनगर, जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील सेविकांनी एकत्र येत घोषवादन सादर केले आणि शिस्त, साधना व राष्ट्रप्रेमाचा निनाद अनुभवायला मिळाला.

राष्ट्र सेविका समितीमध्ये येणाऱ्या मुली सुदृढ, सशक्त, स्वसंरक्षणात सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने शाखांमध्ये शारीरिक विभागांतर्गत योगासने, गणसमता, नियुद्ध, दंड यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. गणवेशधारी सेविका जेव्हा सघोष पथसंचलन करतात, तेव्हा केवळ सहभागीच नव्हे तर पाहणाऱ्यांच्याही मनात राष्ट्रप्रेमाची भावना दाटून येते.

राष्ट्र सेविका समितीत १९६७ साली घोष अभ्यासाला प्रारंभ झाला. घोष विभागामध्ये शास्त्रीय रागांवर आधारित रचना वंशी आणि आनक यावर सादर केल्या जातात. या घोषवादनात पणव, त्रिभुज, झल्लरी यांसारख्या तालवाद्यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. घोषप्रमुख घोषदंडाच्या सहाय्याने संपूर्ण घोषगणाचे संचालन करतात आणि त्या माध्यमातून शिस्तबद्ध, एकसंध आणि प्रभावी सादरीकरण घडते.

                                      

राष्ट्र सेविका समितीला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नव्वद मुली व महिलांनी एकत्र येत घोषवादन सादर करण्याची संकल्पना या कार्यक्रमामागे होती. घोष म्हणजे केवळ संगीताचे संयोजन नसून, त्यातून मनाची एकाग्रता वाढते, शिस्त निर्माण होते आणि सामूहिकतेची भावना दृढ होते, हे या सादरीकरणातून प्रकर्षाने जाणवले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. मोहिनी रायबागकर उपस्थित होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून स्वातीताई तळेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीनगर विभाग कार्यवाहिका निलिमाताई वडगावकर यांनी केले. पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर संपूर्ण वंदे मातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

राष्ट्र सेविका समितीच्या या घोषवादन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रसिकांनी शिस्त, साधना आणि राष्ट्रभक्तीचा अनुभव घेतला. महिलांमध्ये आत्मबळ, संघटनशक्ती आणि राष्ट्रप्रेम जागवणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला.


-------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने