मुंबई ते चंद्रपूर, राज्यातील 29 महापालिकांत कोणत्या पक्षाला किती जागा? कुठे कोणाची सत्ता; वाचा निकाल

 

मुंबई : राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे वर्चस्व पुन्हा ठळकपणे समोर आले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीने सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला असून ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 122 जागांसाठी निवडणूक झाली. येथे शिवसेनेने 53 जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवले असून भाजप 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाकरे गटाला 11, काँग्रेसला 2, मनसेला 5 आणि शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. संख्याबळावरून सत्तास्थापनेसाठी युतीची गणिते निर्णायक ठरणार आहेत.

चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेसने मित्रपक्ष जनविकास सेनेसह 33 जागा मिळवत आघाडी घेतली आहे. भाजपला 23 जागा मिळाल्या असून शिवसेना ठाकरे गटाला 6 जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय एमआयएम, बसपा, वंचित, शिंदे गट आणि अपक्षांनीही प्रतिनिधित्व मिळवले आहे.

अमरावती महानगरपालिकेत 87 पैकी भाजपाने 25 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाने प्रत्येकी 16 जागा मिळवल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला 11 जागा मिळाल्या आहेत. एमआयएमने 10 जागांवर विजय मिळवला असून शिंदे गट, ठाकरे गट, बसपा आणि वंचित आघाडीला मर्यादित यश मिळाले आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपाने 57 जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. एमआयएमला 33 जागा मिळाल्या असून शिंदे गटाला 13 आणि ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे येथे ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. एकूण 128 जागांपैकी भाजपाने तब्बल 84 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीला 37 जागा मिळाल्या असून शिवसेनेला 6 आणि एका जागेवर अपक्ष विजयी झाला आहे. काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट आणि मनसेला एकही जागा मिळालेली नाही.

सोलापूर महानगरपालिकेतही भाजपाने जोरदार कामगिरी करत 102 पैकी 87 जागा जिंकल्या आहेत. एमआयएमला 8, शिवसेनेला 4, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. उर्वरित पक्षांना खातेही उघडता आलेले नाही.

भिवंडी महापालिकेत निकाल अत्यंत चुरशीचा ठरला आहे. येथे काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या असून भाजप, शिंदे गट, शरद पवार गट, समाजवादी पार्टी आणि स्थानिक आघाड्यांनीही चांगली उपस्थिती नोंदवली आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने येथे सत्तास्थापनेसाठी युती अपरिहार्य ठरणार आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 38 प्रभागांमधून 151 सदस्य निवडून देण्यात आले असून नागपूरमध्ये पुन्हा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. मोठ्या मतदारसंख्येच्या या महापालिकेत भाजपाचे वर्चस्व कायम राहिले आहे.

एकूणच राज्यातील 29 महापालिकांच्या निकालातून भाजप हा जागा आणि प्रभाव या दोन्ही बाबतीत सर्वात मोठा विजेता ठरला आहे. आता अनेक महापालिकांमध्ये महापौर कोण होणार आणि सत्तास्थापनेची अंतिम गणिते कशी जुळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

------------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने