महाराष्ट्रात मुंबईसह 29 महापालिकां निवडणुकीच्या निकालात भाजपचं वर्चस्व. बीएमसीत मतांच्या संख्येतही भाजप नंबर वन, ठाकरेंना मोठा धक्का.
मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भाजपचं वर्चस्व स्पष्ट केलं आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेलेली बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक असो किंवा राज्यातील इतर महापालिका, बहुसंख्य ठिकाणी भाजपचं कमळ फुलल्याचं चित्र समोर आलं आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीने सर्वाधिक जागा जिंकत पालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला असून, तब्बल 25 वर्षांनंतर शिवसेनेचा महापौर मुंबईत नसणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठी अस्मिता आणि ‘मुंबई वाचवा’चा नारा दिला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटासोबत राज ठाकरे यांच्या मनसेची युती करून त्यांनी जोरदार प्रचार केला, मात्र भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या युतीपुढे त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. निकालांनंतर भाजपने केवळ जागांच्या बाबतीतच नव्हे तर मतांच्या संख्येतही आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
मुंबई महापालिकेतील एकूण 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 89 उमेदवार विजयी झाले असून त्यांना एकूण 11 लाख 79 हजार 273 मतं मिळाली आहेत. मतांच्या संख्येत भाजप पहिल्या स्थानावर राहिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 65 उमेदवार निवडून आले असून त्यांना 7 लाख 17 हजार 736 मतं मिळाली आहेत. या दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये तब्बल चार लाखांहून अधिक मतांचा फरक दिसून येतो, ज्यामुळे भाजप मतांच्या बाबतीतही निर्विवादपणे नंबर वन ठरला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे 29 उमेदवार विजयी झाले असून त्यांना 2 लाख 73 हजार 326 मतं मिळाली आहेत. काँग्रेसचे 24 उमेदवार निवडून आले असून त्यांच्या वाट्याला 2 लाख 42 हजार 646 मतं आली आहेत. या आकडेवारीवरून मुंबईतील जनमताचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसतो.
राज्यातील इतर महापालिकांमध्येही भाजपाने आघाडी घेत बहुसंख्य ठिकाणी सत्ता मिळवली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजपाचं वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचं चित्र आहे. आता मुंबई महापालिकेचा महापौर नेमका कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
--------------------------------
