मारिया मचाडो यांनी डोनाल्ड ट्रंप यांना 'नोबेल’ भेट दिल्याचा दावा !

व्हेनेझुएलाच्या राजकीय संकटात विरोधी नेत्या आणि नोबेल विजेत्या मारिया कोरीना मचाडो यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी व्हाइट हाऊसमध्ये भेट. नोबेल पुरस्कार भेट दिल्याच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण.

नवी दिल्ली : व्हेनेझुएलातील तीव्र राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधी नेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना मचाडो यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी अखेर भेट झाली आहे. या भेटीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष लागले होते. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या या चर्चेनंतर मचाडो यांनी एक मोठा दावा करत आपण ट्रंप यांना आपला नोबेल शांतता पुरस्काराचा पदक भेट दिल्याचे सांगितले आहे.

गुरुवारी लंच मीटिंगसाठी मचाडो व्हाइट हाऊसमध्ये पोहोचल्या होत्या. ही बैठक व्हेनेझुएलाच्या राजकीय भवितव्याबाबत सुरू असलेल्या तीव्र चर्चांच्या पार्श्वभूमीवर झाली. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईनंतर माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर देशातील राजकीय परिस्थिती अधिकच तापली आहे.

बैठक सुमारे एका तासाहून अधिक काळ चालली. व्हाइट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर मचाडो यांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. समर्थकांना संबोधित करताना त्यांनी, “आपण राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर विश्वास ठेवू शकतो,” असे सांगितले. यानंतर काही समर्थकांनी “थँक यू, ट्रंप” अशा घोषणा दिल्या. त्यानंतर मचाडो वॉशिंग्टनमधील इतर बैठकींसाठी रवाना झाल्या.

नोबेल पुरस्काराचे पदक ट्रंप यांनी प्रत्यक्षात स्वीकारले का, असा प्रश्न विचारण्यात आला असता मचाडो यांनी त्यावर थेट उत्तर देण्यास नकार दिला. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अटकळींना आणि यापूर्वी ट्रंप यांना पुरस्कार देण्याबाबत केलेल्या त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांना या घटनेमुळे नवे बळ मिळाले आहे. या ‘गिफ्ट डिप्लोमेसी’मुळे वॉशिंग्टनपासून कराकसपर्यंत नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

--------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने