प्रत्येक तालुक्यात सहा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे’

 महसूल विभागाच्या १५ सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध

राज्यातील प्रत्येक तालुक्यात सहा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे’ आयोजित केली जाणार असून महसूल विभागाच्या १५ सेवा एकाच ठिकाणी देण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलद आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी महसूल विभागाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात एकूण सहा शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळात केली.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान महसूल मंडळ स्तरावर पूर्वतयारी केली जाणार आहे. या कालावधीत नागरिकांकडून अर्ज स्वीकृती, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि पूर्तता यासारखी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे शिबिराच्या दिवशी नागरिकांना प्रत्यक्ष लाभ तत्काळ देता येईल, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. मार्च महिन्यात तालुक्यातील दोन महसूल मंडळांसाठी ७ आणि १४ मार्च रोजी शिबिरे आयोजित केली जातील. एप्रिल महिन्यात उर्वरित दोन मंडळांसाठी १० आणि १७ एप्रिल रोजी शिबिरे पार पडतील. मे महिन्यात नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर ८ आणि १५ मे रोजी दोन शिबिरे आयोजित करण्यात येतील. अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यात एकूण सहा शिबिरांच्या माध्यमातून महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचणार आहे.

या समाधान शिबिरांमध्ये महसूल विभागाच्या १५ महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये विविध दाखले, ७/१२ उतारे तसेच इतर शासकीय योजनांशी संबंधित सेवा समाविष्ट असतील. नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या अभियानासाठी सर्व खासदार, आमदार, पालकमंत्री आणि इतर मंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला.



_____





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने