इराणने इशारे धुडकावले; गरज पडल्यास सैन्य कारवाई करू, ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या क्षेपणास्त्र व अणुकार्यक्रमावर कठोर भूमिका घेत गरज पडल्यास सैन्य उतरवण्याचा इशारा दिला.

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील धोरण अधिक कठोर करण्याचे संकेत देत गरज पडल्यास थेट सैन्य कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. इराणकडून विकसित करण्यात येत असलेल्या क्षेपणास्त्र आणि अणुकार्यक्रमामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्यांकडे इराणने दुर्लक्ष केल्यामुळेच कठोर भूमिका घ्यावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी म्हटले की, इराण लांब पल्ल्याच्या अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती करत होता, जी थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतात. तसेच युरोपमधील आणि परदेशातील अमेरिकन लष्करी तळांनाही या क्षेपणास्त्रांचा धोका निर्माण झाला होता. मध्य पूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यासाठीही इराणची भूमिका धोकादायक ठरत असल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित काही ठिकाणांवर लक्ष्य साधले होते. त्यानंतरही इराणने अण्वस्त्र मिळवण्याच्या प्रयत्नांवर पाणी सोडले नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. “आम्ही वारंवार चेतावणी दिली, मात्र त्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही. जर अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू,” असे ते म्हणाले.

इराण आपल्या पारंपरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा झपाट्याने विस्तार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा अमेरिका-इराण संबंधांबाबत चर्चा रंगू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी काळात अमेरिका कोणती ठोस पावले उचलते, तसेच इराणची अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. मध्य पूर्वेतील स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

---------------------------------------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने