रश्मी वहिनींना कोणी शिव्या घातल्या? नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

 


सर्वोच्च न्यायालयाबाहेरील कथित शाब्दिक वादानंतर नरेश म्हस्केंनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले. रश्मी ठाकरेंबाबतही म्हस्केंनी मोठा दावा केला.

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील कायदेशीर वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाबाहेर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यातील कथित शाब्दिक चकमकीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेत आला आहे. या घटनेनंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोप केले.

सर्वोच्च न्यायालयाबाहेर संजय राऊत यांनी आपल्याकडे पाहून “घेऊन ये त्याला” असे म्हटल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला. त्यानंतर राऊत यांनी “अरे ये ना, यावंच लागणार आहे ना” असे म्हटल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना “फेकूचंद” असे संबोधले. “नरेश म्हस्के त्यांना प्रत्येकवेळी उत्तर देतो. त्यांच्याबद्दल ‘भोंगा’ वगैरे शब्दांची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो,” असा टोला म्हस्केंनी लगावला.

पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबतही गंभीर दावा केला. “ज्या वेळी त्यांना राज्यसभेचे तिकीट लवकर जाहीर होत नव्हते, त्या वेळी उद्धव ठाकरे सोडा, रश्मी वहिनींना किती शिव्या घातल्या होत्या, हे अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे,” असा आरोप त्यांनी केला. “त्यांचे नाव जाहीर करण्यास उशीर झाला म्हणून ते हे सर्व बोलले,” असा दावाही नरेश म्हस्के यांनी केला. 

नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले. “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले; मात्र स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिले नाही. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, म्हणून शिवसेनेच्या आमदारांना पवईतील हॉटेलमध्ये बैठक घ्यायला कोणी लावली? उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव घ्या, असे कोण सांगत होते, हे अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे,” असा दावा त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाची भूमिका घेतल्यानंतर आपण त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचेही नरेश म्हस्के यांनी सांगितले. “एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाणारा पहिला जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी पाऊल उचलले, त्या वेळी उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. मी स्पष्टपणे सांगितले की, मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. तुम्हाला भेटायला येणार नाही,” असे म्हस्के म्हणाले.

“मला वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आले, तेव्हाही मी स्पष्टपणे सांगितले होते की, एकनाथ शिंदे साहेबांना बोलवा. अन्याय करू नका. काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करा,” असा दावा त्यांनी केला.

नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या कथित जुन्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. “अयोध्येच्या दौऱ्यात तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांसमक्ष मला सांगितले होते की, विधान परिषदेसाठी तुझे नाव आहे. मात्र अमशा पडवी यांना विधान परिषदेचे तिकीट दिले. तुम्ही शपथ घेऊन सांगा, उद्धव ठाकरे म्हणाले होते की नरेश म्हस्केला तिकीट दिले तर तो एकनाथ शिंदेंसोबत जाईल, हे तुम्हीच मला सांगितले होते,” असा दावा त्यांनी केला.

संजय राऊत यांनी आपल्याबाबत केलेल्या वक्तव्यांवर नरेश म्हस्के यांनी थेट आव्हान दिले. “जर तुम्ही खरोखर बाळासाहेबांना मानत असाल, तर नरेश म्हस्केचे एक जरी पत्र तुमच्याकडे असेल तर दाखवा. एकतर तुम्ही राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो,” असे म्हस्के म्हणाले. “सिनियर लीडर म्हणून तुमचा आदर ठेवतोय. बंद मूठ आहे, ती बंदच राहू द्या. शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही सतत फोन करत होता. काय बोलत होता, ते जाहीर करा,” असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. न्यायालयाबाहेरील व्हिडीओ आणि त्यानंतर नरेश म्हस्के यांनी केलेल्या आरोपांमुळे या वादाला आणखी धार आली आहे. मात्र, म्हस्के यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत किंवा ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने