इस्रायल-इराण तणावामुळे मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय प्रवाशांसाठी इंडिगो 3 मार्च 2026 पासून जेद्दा येथून 10 विशेष उड्डाणे चालवणार.
नवी दिल्ली: इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार IndiGo ने 3 मार्च 2026 पासून जेद्दा येथून भारतासाठी 10 विशेष उड्डाणे चालवण्याची योजना आखली आहे. हे उड्डाणे आवश्यक शासकीय परवानग्या आणि हवाई क्षेत्रातील विद्यमान परिस्थितीवर अवलंबून असतील.
इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात संयुक्त कारवाई केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला असून अनेक देशांमध्ये उड्डाणांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक विविध देशांत अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिगोने जेद्दा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने विशेष रिलीफ ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, Air India Express नेही 3 मार्चपासून मस्कट येथून उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मस्कटहून दिल्ली, कोची, कोझिकोड, मंगळुरू, मुंबई आणि तिरुचिरापल्ली या शहरांसाठी उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्कटहून तिरुचिरापल्लीकडे जाणारे पहिले उड्डाण सकाळी 10.25 वाजता रवाना होईल. प्रवाशांनी आपल्या उड्डाणासंबंधी अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत बहरीन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह काही खाडी देशांसाठीची उड्डाणे 3 मार्च 2026 पर्यंत रद्द राहणार असल्याची माहिती विमान कंपन्यांनी दिली आहे. या असुविधेबद्दल संबंधित एअरलाईन्सकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे.
मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीय प्रवाशांना सुरक्षितपणे स्वदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार आणि विमान कंपन्यांकडून समन्वयाने प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काही दिवसांत हवाई क्षेत्रातील परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
-------------------------------------
