मुंबई : हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेत आणि इंडस्ट्रीचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
धर्मेंद्र यांचे जाणे म्हणजे हिंदी सिनेमातील एका सुवर्णयुगाचा अंत आहे. ८ डिसेंबर रोजी त्यांनी आपला ८९ वा वाढदिवस साजरा केला होता. काही दिवसांनंतरच त्यांची तब्येत अचानक खालावली मधल्या काळात उपचारानंतर त्यांना घरी हलवण्यात आले होते, आणि डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते त्यांनी आज या जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली आहे.
धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा हसरा फोटो शेअर करत चाहत्यांना प्रार्थनेचे आवाहन केले होते. त्यांनी लिहिले होते, “मी सर्वांचे आभार मानते ज्यांनी धरमजींची काळजी घेतली. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. कृपया त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.” त्यानंतर धर्मेंद्र यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. तेव्हा हेमामालिनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
धर्मेंद्र यांचा सिने प्रवास हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत प्रेरणादायी प्रवासापैकी एक मानला जातो. तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात वर्चस्व राखले आणि ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले. १९६० मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या पहिल्या चित्रपटापासून ते २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेरी बातों में ऐसा उलझा जिया पर्यंत त्यांनी काम केलं. त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव इक्कीस असून तो डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता.
पंजाबमधील लुधियाणा जिल्ह्यातील नसराली या छोट्या गावात धर्मेंद्र यांचा जन्म झाला. एका शाळाशिक्षकाच्या मुलाने दिलीप कुमार आणि मोतीलाल यांना पडद्यावर पाहून अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं. त्या काळात अशा पार्श्वभूमीतून मुंबईत येऊन यश मिळवणं अत्यंत कठीण होतं. पण धर्मेंद्र यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांना १९५८ मध्ये फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकून पहिला ब्रेक मिळवून दिला. अर्जुन हिंगोरानी यांनी त्यांना दिल भी तेरा हम भी तेरे मध्ये पहिली संधी दिली.
१९६३ मध्ये बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातून धर्मेंद्र यांना ओळख मिळाली, तर फूल और पत्थर (१९६६) या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवलं. त्यानंतरच्या दशकात शोले, चुपके चुपके, यादों की बारात, धरम वीर यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि भल्याभल्यांना भुरळ पाडणाऱ्या देखण्या चेहऱ्यामुळे धर्मेंद्र यांना ‘ही-मॅन ऑफ बॉलीवुड’ ही उपाधी लाभली.
सलमान खान यांनी दा म्हटलं होतं की “धर्मेंद्रसारखा देखणा पुरुष मी पाहिलेला नाही.” तर दिलीप कुमार यांनी विनोदाने म्हटलं होतं, “देवाने मला धर्मेंद्रइतका सुंदर का नाही बनवलं?” धर्मेंद्र यांचा राग, त्यांचा भाबडेपणा आणि दिलदार स्वभाव यांनी त्यांना लोकांच्या मनात कायमचं स्थान मिळवून दिलं.
वैयक्तिक आयुष्यात धर्मेंद्र यांनी दोन विवाह केले. पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी अभिनेत्री हेमा मालिनी. त्यांच्या मुलांमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघेही यशस्वी अभिनेते ठरले. देओल कुटुंबासाठी हा काळ अत्यंत दुःखद आहे. सनी देओल यांनी दुःख व्यक्त करत म्हटलं की “पापा फक्त आमचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे होते.”
कृषक कुटुंबातून आलेला हा मस्तमौला मुलगा आपल्या मेहनतीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा स्टार बनला. धर्मेंद्र यांचं आयुष्य हे संघर्ष, प्रेम, यश आणि सादगीचा सुंदर मिलाफ असलेली एक ब्लॉकबस्टर कथा होती.
त्यांचा अंतिम संस्कार मुंबईत होणार असून बॉलीवूडमधील अनेक नामवंत व्यक्ती त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. धर्मेंद्र जरी या जगातून निघून गेले असले, तरी त्यांचा हसरा चेहरा, त्यांची शैली आणि त्यांचा आवाज भारतीय सिनेमाच्या इतिहासात सदैव जिवंत राहील.
------------------------------------------