धर्मेंद्र यांना सनी देओलकडून मुखाग्नी, अवघ्या अर्ध्या तासात ‘ही-मॅन’चा अंतिम संस्कार, बॉलीवूडवर शोककळा !


मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि चाहत्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेले अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि एका दिग्गज कलाकाराचा पडदा कायमचा पडला. देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या काही दिवसांपासून सावधगिरी बाळगली होती, परंतु निधनासंदर्भात अधिकृत माहिती जारी न करता अतिशय शांतपणे आणि अल्प वेळात त्यांची अंत्ययात्रा पार पडली. अवघ्या अर्ध्या तासांतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि थोरला मुलगा सनी देओलने वडिलांना मुखाग्नी दिला.

जुहू येथील धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी दुपारी साडेबाराच्या सुमारास रुग्णवाहिका पोहोचली आणि क्षणार्धातच परिसरात उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली तर घरात नातेवाईकांची गर्दी दिसू लागली. धर्मेंद्र यांच्या मुलीही घाईघाईने घरात दाखल झाल्या. दुसरीकडे, कुणालाही माहिती मिळण्याआधीच पवनहंस स्मशानभूमीत अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल दिसल्या. त्यानंतर लगेच धर्मेंद्र यांच्या पार्थिवाचा स्मशानभूमीत पोहचवण्यात आला आणि अतिशय निवांत, गोंधळ टाळत, कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय अंतिम संस्कार सुरू करून पूर्णही झाले. सनी देओलने भावनिक अवस्थेत वडिलांना शेवटचा निरोप देत मुखाग्नी दिला आणि सहा दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा ‘ही-मॅन’ अनंतात विलीन झाला.

धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास त्यांच्या घरी घेतला. 12 नोव्हेंबर रोजी त्यांना कुटुंबाच्या विनंतीवरून डिस्चार्ज देण्यात आला होता आणि त्यानंतर उपचार घरातच सुरू होते. या काळात त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. देओल कुटुंबीयांनी या अफवांवर तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली होती. सनी देओलने घराबाहेर उभ्या असलेल्या पॅपाराझींना सुनावलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. तसेच ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. तरीही धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत देओल कुटुंबाने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

विशेष म्हणजे, सोमवारीच धर्मेंद्र यांच्या आगामी ‘इक्कीस’ चित्रपटातील त्यांच्या पात्राचे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये त्यांचा आवाजही होता. हे मोशन पोस्टर पाहताच चाहत्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. चाहत्यांसमोर एकीकडे त्यांचा आवाज गुंजत होता आणि दुसरीकडे त्यांच्या निधनाची वार्ता पसरत होती. अचानक, शांततेत आणि अल्पावधीत झालेल्या अंत्यसंस्कारामुळे चाहत्यांना निरोप द्यायची संधीही मिळाली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर दुःखाचे आणि श्रद्धांजलीचे संदेश दिसत आहेत.

धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेमा एका  पर्वातील तेजस्वी तारा गमावला आहे. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’, ‘धर्म वीर’, ‘चुपके चुपके’ ते ‘रॉकी और रानी’पर्यंत सहा दशकांचा त्यांचा प्रवास अनंत चाहत्यांच्या आठवणीत कायम जिवंत राहील. आज बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’चा निरोप जरी शांततेत झाला असला तरी त्यांची कर्तृत्वकहाणी सदैव घुमत राहील.


--------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने