पलाश सोबतचं लग्न टळल्यानंतर स्मृती मानधनाच धक्कादाय पाऊल; लग्नातील पोस्ट केल्या डिलीट


मुंबई : संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणारे लग्न पुढे ढकलल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधनाने घेतलेलं पाऊल चर्चेचा विषय ठरत आहे. 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत दोघांचा विवाहसोहळा होणार होता; मात्र स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची अचानक प्रकृती बिघडल्याने हा समारंभ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. सकाळी न्याहारी दरम्यान त्यांना छातीत अचानक वेदना जाणवल्या, त्यानंतर त्यांना तातडीने सांगलीतील सार्व्हित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. 

रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना हृदयविकाराची लक्षणं दिसून आल्याने उपचार तातडीने सुरू करण्यात आले आहेत. मुलीच्या लग्नातील तयारी, धावपळ आणि मानसिक ताणामुळे हा त्रास उद्भवला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

या सर्व घडामोडींनंतर स्मृतीने घेतलेला निर्णय सर्वांना चकित करणारा ठरला आहे. वडील पूर्णपणे ठणठणीत होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्वतः स्मृतीने घेतल्याची माहिती तिचे व्यवस्थापक तोहिन मिश्रा यांनी दिली. हा निर्णय समोर आल्यानंतर स्मृतीने आणखी एक पाऊल उचलत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडिओ काढून टाकले. काही दिवसांपूर्वीच स्मृतीने टीममधील सहकाऱ्यांसोबत एक खास रील शेअर करून साखरपुड्याची घोषणा केली होती. 

‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील ‘समझो हो ही गया’ या गाण्यावर ती थिरकताना दिसली होती आणि त्या व्हिडिओमध्ये तिने साखरपुड्याची अंगठी दाखवत चाहत्यांना मोठा सरप्राइज दिला होता. जेमिमा रोड्रिग्स, श्रेयांका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी या सहकाऱ्यांचा यात धमाल डान्स होता. मात्र हा व्हिडिओ आता स्मृतीच्या अकाऊंटवर उपलब्ध नाही.

दुसऱ्या बाजूला पलाश मुच्छलने काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीला अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं होतं. त्याने 21 नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना रोमँटिक सरप्राइज दिलं होतं. त्याच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ अद्यापही पाहायला मिळत असला तरी स्मृतीने तिच्याकडील सर्व लग्नाशी संबंधित पोस्ट हटवल्याने चाहत्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लग्न पुढे ढकलण्याचं मुख्य कारण वडिलांची प्रकृती असली तरी स्मृतीने सोशल मीडियावरील सर्व लग्नातील क्षण हटवल्याने चर्चा अधिकच चिघळली आहे. स्मृतीचे वडील सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असून तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र लग्नाचा पुढील निर्णय वडिलांच्या आरोग्यावरच अवलंबून असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान चाहत्यांनी स्मृती आणि तिच्या कुटुंबासाठी आरोग्याच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.


--------------------------------------------


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने