कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अखेर राजीनामा दिला. भावुक भाषणात त्यांनी काँग्रेस हायकमांडचे आभार मानत विरोधकांवर जोरदार टीका केली.
बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले.
“हायकमांडने सांगितल्यावर मी राजीनामा देईन, हे मी आधीच स्पष्ट केले होते. काल पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला आणि आज मी माझा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला,” असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. राज्यपाल थावरचंद गेहलोत सध्या बंगळुरूबाहेर असल्याने त्यांचा राजीनामा सचिवांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा भावनिक आढावा घेतला. “कर्नाटकच्या ७ कोटी जनतेची सेवा करण्याची संधी मला दोन वेळा मुख्यमंत्री आणि दोन वेळा विरोधी पक्षनेता म्हणून मिळाली. काँग्रेस पक्ष नसता, तर मी कधीच मुख्यमंत्री होऊ शकलो नसतो,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सरकारच्या ‘गॅरंटी’ योजनांमुळे राज्याचा खजिना रिकामा होईल, असा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रचारात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होते, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. मात्र, काँग्रेसच्या कल्याणकारी योजनांमुळे राज्याचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला.
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. पत्रकार परिषदेदरम्यान शिवकुमार हेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिल्याने काँग्रेसमधील सत्तांतर शांततेत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी डी. के. शिवकुमार यांच्या नावावर एकमत झाल्याचे संकेत दिले. त्यामुळे कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
कर्नाटकच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेता म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार हे काँग्रेसचे ‘संकटमोचक’ मानले जातात. बंडखोर आमदारांना एकत्र ठेवणे, रिसॉर्ट पॉलिटिक्सद्वारे सरकार वाचवणे आणि पक्षाला कठीण प्रसंगातून बाहेर काढणे यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
१९६२ मध्ये रामनगर जिल्ह्यातील कनकपुरा येथे जन्मलेल्या शिवकुमार यांनी अत्यंत तरुण वयात राजकारणात प्रवेश केला. १९८९ मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. २००४ मध्ये त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा पराभव करून ‘जायंट किलर’ अशी ओळख निर्माण केली. आजपर्यंत त्यांनी सलग आठ विधानसभा निवडणुका जिंकल्या असून त्यांना एकदाही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.
वोक्कलिगा समाजातील प्रभावशाली नेतृत्व म्हणूनही डी. के. शिवकुमार यांचे नाव घेतले जाते. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयामागे वोक्कलिगा मतांचे ध्रुवीकरण हे महत्त्वाचे कारण मानले जाते. शिवकुमार यांच्या नेतृत्वामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे वळल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
महाराष्ट्रातील विलासराव देशमुख सरकार वाचवण्यापासून ते अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीपर्यंत अनेक राजकीय संकटांमध्ये शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ईडी आणि आयटी चौकशीचा सामना करूनही त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. त्यामुळे गांधी कुटुंबाचा त्यांच्यावर विशेष विश्वास असल्याचे मानले जाते.
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकात सत्तेची सूत्रे डी. के. शिवकुमार यांच्या हातात जाणार असल्याने राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
°°°°°