Crime news: दोन महिलांनी लग्नाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 55 लाखांने फसवले !

 


कल्याणमध्ये दोन महिलांनी लग्नाचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 55 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

कल्याण : लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याच्या घटना नेहमी समोर येत असतात. मात्र, कल्याणमध्ये चक्क दोन महिलांनी मिळून एका नामांकित व्यावसायिकाला प्रेम आणि लग्नाच्या जाळ्यात अडकवत तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील एका नामांकित दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती. रोमा परदेशी हिने स्वतःला एका मोठ्या विमा कंपनीत काम करत असल्याचे सांगत संबंधित व्यावसायिकाशी जवळीक वाढवली. सुरुवातीला विमा पॉलिसीच्या माध्यमातून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर इन्शुरन्सच्या नावाखाली व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळण्यात आले. मात्र, कोणतीही विमा पॉलिसी प्रत्यक्षात सुरू करण्यात आली नसल्याचे नंतर समोर आले.

काही दिवसांनी रोमा परदेशी हिने जयश्री पाटीलच्या माध्यमातून संबंधित व्यावसायिकाशी लग्न करण्याची तयारी दर्शवली. व्यावसायिकाने लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी विविध कारणे सांगत वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सुमारे ५५ लाख रुपये आरोपी महिलांना देण्यात आले होते.

फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रोमा परदेशी हिला अटक केली होती. नंतर तिला जामीन मंजूर झाला. तपासादरम्यान पोलिसांनी तिची मैत्रीण जयश्री पाटील हिला कोल्हापूरमधून अटक केली आहे.

“लग्नाचे आमिष दाखवून माझी फसवणूक करण्यात आली. आरोपींकडून माझे पैसे परत मिळवून द्यावेत आणि मला न्याय मिळावा,” अशी मागणी तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महात्मा फुले चौक पोलीस करत आहेत.

दरम्यान, उल्हासनगरमध्येही ऑनलाइन पेमेंटच्या नावाखाली फसवणुकीची आणखी एक घटना समोर आली आहे. कॅम्प ३ परिसरातील दिशा मशिनरी या दुकानात दोन युवकांनी ऑनलाइन पेमेंट केल्याचे भासवत तब्बल साडेसहा हजार रुपयांची पाण्याची मोटार घेऊन पलायन केले. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुकान मालकानी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी दोन युवक दुचाकीवरून दुकानात आले होते. त्यांनी पाण्याची मोटार खरेदी करत गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचे दाखवले. मात्र, काही वेळानंतर खात्यात पैसे जमा न झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत आरोपी युवक मोटार घेऊन पसार झाले होते.

या दोन्ही घटनांमुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने