नवी दिल्ली : सुरक्षित गुंतवणूक आणि स्थिर परतावा या दोन्ही गोष्टींसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. सरकारची 100% हमी, आकर्षक व्याजदर आणि शून्य जोखीम असल्यामुळे लाखो गुंतवणूकदार या योजनांकडे वळतात. अशाच योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम (Post Office Time Deposit Scheme), ज्यात गुंतवणूक करून फक्त व्याजातूनच दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करता येते.
या सरकारी योजनेत विविध टेन्योरनुसार वेगवेगळे व्याजदर मिळतात. एका वर्षासाठी 6.9%, दोन वर्षांसाठी 7%, तीन वर्षांसाठी 7.1% तर पाच वर्षांच्या एकरकमी गुंतवणुकीवर तब्बल 7.5% व्याज मिळते. म्हणजे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार टेन्योर निवडून चांगला परतावा मिळवू शकतो.
जर गुंतवणूकदाराने 5 वर्षांचा टेन्योर निवडून 5 लाख रुपये गुंतवले, तर त्यावर 7.5% दराने मिळणारे एकूण व्याज 2,24,974 रुपये इतके होते. त्यामुळे मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदाराला 5 लाखांच्या ऐवजी थेट 7,24,974 रुपये मिळतात. म्हणजे केवळ व्याजातून तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त नफा मिळतो.
ही स्कीम ‘शून्य रिस्क’ पॉलिसी असल्याने यात गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. एवढेच नव्हे तर पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर इनकम टॅक्स ॲक्ट 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचाही लाभ मिळतो. किमान 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून खाते उघडता येते, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. सिंगल किंवा जॉइंट खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध असून 10 वर्षांवरील मुलांचे खातेही त्यांच्या पालकांच्या माध्यमातून उघडता येते.
देशातील कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही गुंतवणूक सहज करता येते आणि सुरक्षिततेसोबतच चांगल्या परताव्याची खात्रीही मिळते. त्यामुळे स्थिर आणि जोखमीविरहित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही एक फायदेशीर योजना ठरत आहे.
--------------------------------------------
