हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो. या काळात शरीराची पचनशक्ती सुधारत असल्याने खाण्याकडे सर्वांचा ओढा वाढतो. थंडीचे दिवस सुरू होताच पहाटेचे गार वातावरण जाणवू लागते आणि ऋतूबदलामुळे शरीराची ऊर्जा आवश्यकता वाढते. या दिवसांत योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहत असून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
थंडी वाढू लागली की शरीराला ऊर्जा जास्त प्रमाणात खर्च करावी लागते. त्यामुळे या ऋतूत खाल्ले जाणारे पदार्थ पचायला सोपे आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. आपल्या घराघरांत हिवाळ्यात डिंकाचे व सुकामेव्याचे लाडू करण्याची परंपरा आहे. हे लाडू प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाने परिपूर्ण असल्याने मुलांना हे नियमितपणे देता येतात; मात्र वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांनी हे लाडू थंडीचा कडाका जास्त असताना मर्यादित प्रमाणात खावेत.
थंड हवामानात कायम गरम काहीतरी प्यावेसे वाटते. मात्र दिवसातून वारंवार चहा किंवा कॉफी घेणे आरोग्यासाठी हितकारक नाही. अशा वेळी हर्बल टी, ग्रीन टी किंवा तुळस, आले, गवती चहा यांचा काढा घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. याशिवाय भाज्यांचे गरम सूप हेही पोषक आणि पचायला हलके पर्याय आहेत. हिवाळ्यात भाज्या आणि पालेभाज्या उत्तम प्रतीच्या उपलब्ध होतात. या भाज्यांतील ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे शरीरासाठी उपयुक्त असल्याने त्यांचा आहारात मुबलक समावेश करावा.
या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळणारे लाल गाजर हेही आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. गाजरातील ‘अ’ जीवनसत्त्व त्वचेच्या आरोग्यासाठी विशेष लाभदायक आहे. गाजर सॅलड, कोशिंबीर, सूप किंवा कधीकधी गाजर हलवा अशा विविध प्रकारांत खाता येते. याशिवाय संत्री, आवळा, डाळिंब यांसारखी फळे रोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. या फळांमधील जीवनसत्त्व C रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.
हिवाळ्यात काहींना सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो. अशा वेळी तळलेले पदार्थ, शीतपेये आणि तेलकट आहार टाळणे चांगले. शरीराची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी पुरेसे पिणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून अनेक जण पाणी कमी पितात; पण विशेष प्रयत्न करून नियमितपणे पाणी प्यावे.
हिवाळ्यात दिवस लहान असल्याने आणि थंडीमुळे अनेकांच्या व्यायामाच्या सवयी ढिल्या पडतात. परंतु व्यायाम हा शरीरासाठी तितकाच आवश्यक आहे. पौष्टिक आहार घेतला आणि पचनशक्ती चांगली असली तरी नियमित व्यायाम नसेल तर शरीराला या पोषक घटकांचा योग्य उपयोग करता येत नाही. त्यामुळे हिवाळ्यात आहाराबरोबरच व्यायामाचे नियोजनही तितकेच आवश्यक आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्वचा-केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि ऊर्जा पातळी संतुलित ठेवण्यासाठी संतुलित, पौष्टिक आणि गरमाहट देणारा आहार हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने हा हंगाम अधिक आरोग्यपूर्ण बनवता येऊ शकतो.
------------------------------------------------------------
