मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कहर वाढू लागला असून जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. हवेत वाढलेला गारवा, सकाळ-संध्याकाळचा बोचरा वारा आणि शहरांमधील वाढत्या शेकोट्या यामुळे राज्यात थंडीची लाट पसरल्याचे चित्र दिसत आहे. पुढील आठवडाभर मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची हुडहुडी कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात निवडणुकांचे राजकीय तापमान वाढत असतानाच हवामान मात्र उलट थंड होत चालले आहे. धुळ्यात रविवारी अवघे 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आणि त्यामुळे थंडीची झळ अधिक तीव्र जाणवली. सकाळी फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत, तर शेकोट्यांजवळ बसून थंडीपासून बचाव करण्याचे प्रमाणही वाढले आहे. उबदार कपड्यांच्या विक्रीत अचानक वाढ झाली असून राज्यातील बहुतेक बाजारपेठांत हिवाळी कपड्यांची खरेदी जोरात सुरू आहे.
दरम्यान, परभणीत गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका कायम आहे. तापमान 10 अंशाखाली गेल्याने शहरासह ग्रामीण भागात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. दिवसभर हवेत गारवा जाणवत असून शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि दूध-भाजी विक्रेत्यांना या थंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेकोट्या पेटतानाचे दृश्य दिसते. रब्बी हंगामातील गहू-हरभरा पिकांसाठी ही थंडी मात्र पोषक ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येही गेल्या आठ दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी किमान तापमान 10.2 अंशांच्या आसपास नोंदले जात आहे, तर वेण्णा लेक परिसरात तापमान त्याहूनही खाली उतरत आहे. दिवसभर ऊन असले तरी संध्याकाळपासून जोरदार गारठा जाणवत आहे. पर्यटकांना धुक्यात नटलेले निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला मिळत असून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी आणि जॅकेट्सची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात, विशेषतः तोरणमाळ परिसरात, तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. सकाळी उशिरापर्यंत रस्ते ओस पडलेले दिसत आहेत, तर रात्री शेकोट्या पेटवून लोक थंडीपासून बचाव करत आहेत. तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. थंडी वाढल्यानंतर ग्रामीण भागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतात हालचाल वाढल्याचे चित्र दिसते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान सतत घसरत असल्याने हिवाळ्याची चाहूल आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
-------------------------------------------------------------------------
