बंपर डिमांड ! दिवाळीनंतरही खरेदीचा जोर कायम; मागणीत घट नाही, सकारात्मक बदलाचे आश्चर्य !

नवी दिल्ली : दिवाळीनंतर बाजारात नेहमीप्रमाणे शांतता परत येते, दुकाने ओस पडतात आणि कंपन्यांच्या विक्रीतही मंदी दिसते. मात्र 2025 मध्ये परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. दिवाळी संपली असली तरी बाजारातील खरेदीचा उत्साह अजूनही तसाच जोमानं सुरू असून ग्राहकांची गर्दी अगदी दिवाळीपूर्वीइतकीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा फेस्टिव सीजननंतरही मागणीत कोणतीही घट न झाल्याने कंपन्यांनाही हा सकारात्मक बदल आश्‍चर्यचकित करीत आहे.

देशातील मॉल, दुकाने आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीचा जोर अजूनही कायम आहे. या वाढत्या मागणीमागे मोठा लग्नाचा हंगाम, सरकारकडून मिळालेली करकपात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरू झालेल्या थंडीची चाहूल ही प्रमुख कारणे असल्याचे उद्योग क्षेत्रातुन सांगण्यात येत आहे. अनेक कंपन्यांनी या तिमाहीत विक्रीत 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे.

एलजी इलेक्ट्रॉनिक्स, लाइफस्टाइल इंटरनॅशनल, हायर, टायटन, रेमंड लाइफस्टाइल, एडल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस आणि कल्याण ज्वेलर्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या मते, दिवाळीनंतरची मागणी यंदा अपेक्षेपेक्षा प्रचंड जास्त आहे.  पोस्ट-दिवाळी मागणीत अजिबात घट दिसलेली नाही. एलजी कंपनीचे उत्पादन प्रकल्प 85 टक्के क्षमतेवर दुहेरी शिफ्टमध्ये चालू असून मागणीही तितक्याच वेगाने वाढत आहे.

लग्नसराईने बदलला बाजाराचा खेळ या वर्षी उत्तर भारतातील उष्णतेमुळे आणि भू-राजकीय कारणांमुळे अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले होते. ते आता डिसेंबर- जानेवारीत होत असल्याने कपडे, दागिने, गृहउपयोगी उपकरणे आणि गिफ्ट आयटम्सची विक्री वेगाने वाढत आहे. लाइफस्टाइल इंटरनॅशनलने सांगितले की, या तिमाहीतच 12 ते 14 शुभ मुहूर्त असल्याने मागणी सातत्याने वाढत आहे. दागिन्यांच्या क्षेत्रातही टायटन आणि कल्याण ज्वेलर्स यांनी दिवाळीनंतरची विक्री तितक्याच वेगाने सुरू असल्याचे सांगितले. शिवाय सोन्याच्या किमतीत झालेल्या 3 ते 6 टक्के घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत आहे.

 केंद्र सरकारने 99% ग्राहक वस्तूंवरील GST कमी केल्यामुळे कुटुंबीयांच्या खर्चाचा भार हलका झाला आहे. त्यासोबतच आयकर मर्यादा वाढवून 12 लाख रुपयांपर्यंत सूट मिळाल्याने पगारदार वर्गाची खर्च करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. या दोन्ही निर्णयांचा फेस्टिव डिमांडवर थेट सकारात्मक परिणाम दिसत आहेत असे तज्ञांचे मत आहे.

थंडीची चाहूल आणि ग्रामीण मागणीत सुधारामुळे दिलासा यंदाचा मान्सून उत्तम झाल्याने आणि महागाई इतिहासातील नीचांकी स्तरावर आल्याने ग्रामीण कुटुंबांची खरेदीक्षमता वाढली आहे. त्यामुळे तेल, साखर, तांदूळ, मैदा यांसारख्या मोठ्या पॅक उत्पादनांची विक्री वाढत आहे. एडल्यूएलच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यातील विक्री ऑक्टोबरपेक्षा अधिक आहे.

या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम असा झाला की 2025 मध्ये दिवाळीनंतरही बाजारात खरेदीचा जोर आणि फेस्टिव सीजनसारखीच ऊर्जा कायम आहे, ज्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.


  ------------------------------------------------




 

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने