पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनण्याची कल्पनाच नको; काम न करणाऱ्यांना फटके मारणारा अधिकारी बनवा! नितीन गडकरींचे स्पष्ट वक्तव्य

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमातून पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदाबद्दलचे आपले मत स्पष्ट केले. राजकारणात नेहमीच त्यांचं नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत घेतलं जातं; पण गडकरींनी स्पष्ट शब्दांत सांगितले की त्यांना या पदांची मुळीच इच्छा नाही. उलट, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना फटके मारण्याचा अधिकार असलेला महानगरपालिकेचा अधिकारी बनणे मला जास्त पसंत आहे, अशी थेट टिप्पणी त्यांनी आयआयएमच्या कार्यक्रमात करून सभागृहात हास्याची लाट पसरवली.

गडकरींनी शिक्षण, प्रात्यक्षिक ज्ञान आणि काम करण्याची मानसिकता याबद्दल स्पष्टपणे मत मांडले. गुणांच्या आधारावर योग्यता ठरत नाही, हे सांगताना ते म्हणाले की विधि अभ्यासक्रमात ज्यांना टॉप मार्क मिळाले, ते आज वकीली व्यवसायात नाव कमावू शकले नाहीत; उलट शेवटच्या बाकावर बसणारेच मोठे वकील झाले. अभ्यास कितीही केला तरी प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता नसल्यास उपयोग नाही.

यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेच्या कामकाजावर तीव्र टीका केली. आयआयएम नागपूरची सुंदर इमारत उभारण्यासाठी नियमांमध्ये बदल करून गुणवत्तापूर्ण डिजाइन निवडली आणि खासगी कंत्राटदाराला जबाबदारी दिली. त्यामुळे आयआयएमसारखी दर्जेदार वास्तू उभी राहिली. पण याच बाजूला असलेल्या एम्समध्ये मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी निकृष्ट काम करून सरकारी हस्तक्षेप कसा परिणामकारक ठरतो याचा प्रत्यय दिला. स्वतः सरकारमध्ये असूनही मी गध्याला घोडा म्हणू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका कंत्राटदाराने केलेल्या बेकार कामाबद्दल त्याला दरवाजा बंद करून चांगलंच सुनावल्याचेही गडकरींनी खुलासेपूर्वक सांगितले.

गडकरींनी नागपूर महापालिकेतही काही अधिकारी आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीविरोधात रोष व्यक्त केला. ते म्हणाले की, “मी देवाला मागणारच आहे की मला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनवू नकोस; पण महापालिकेमध्ये अधिकारी बनव आणि फटके मारण्याचा अधिकार दे, म्हणजे काम न करणाऱ्यांना थोडाफार रास्त मार्गावर आणता येईल.”

यावेळी त्यांनी मीहान प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली आणि प्रत्येक मोठ्या कामासाठी इच्छाशक्ती आणि जबाबदारीची भावना अत्यंत गरजेची असल्याचे सांगितले. नागपूरमध्ये रोजगाराची कमतरता नसून अनेक कंपन्यांमुळे तरुणांना नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले. आयुष्यात आरोग्याला सर्वोच्च स्थान द्या, कारण प्रत्येकाकडे उणिवा आणि जमेच्या बाजू असतात; परंतु त्या ओळखून स्वतःला सुधारत राहणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शेवटी ते म्हणाले की, लोकांना स्वप्न दाखवणारे नेते आवडतात, परंतु ती स्वप्न पूर्ण करणाऱ्या नेत्यांवर खऱ्या अर्थाने प्रेम केले जाते. त्यांच्या या वक्तव्यांनी पुन्हा ते का वेगळे आणि स्पष्टवक्ते नेते मानले जातात, याची जाणीव प्रेक्षकांना झाली.



      -----------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने