पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षालाही करारी पराभव पत्करावा लागला. एकही जागा मिळवण्यात पक्ष अपयशी ठरल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, आता जनसुराज पक्षाने केलेल्या गंभीर आरोपामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
‘बिहारच्या निवडणुकीत जागतिक बँकेचा तब्बल १४ हजार कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला’, असा धक्कादायक दावा जनसुराज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उदय सिंह यांनी सांगितले की, विकास प्रकल्पांसाठी राखून ठेवलेल्या जागतिक बँकेच्या निधीतील १४ हजार कोटी रुपये निवडणुकीच्या काही तास आधीच काढून राज्यातील महिलांना प्रत्येकी १०,००० रुपयांच्या स्वरूपात वाटण्यात आले. यामुळे मतदारांवर थेट परिणाम झाला असून हा निधी निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी जाणूनबुजून वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, २१ जून ते मतदानाच्या दिवसापर्यंत जवळपास ४०,००० कोटी रुपये जनादेश मिळवण्यासाठी खर्च करण्यात आले.
“जनतेच्या पैशांचा गैरवापर करून एनडीएने मतं खरेदी केली आणि या संपूर्ण प्रक्रियेत जागतिक बँकेकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर झाला," असा गंभीर दावा त्यांनी केला. जनसुराज पक्षाचे प्रवक्ते पवन वर्मा यांनीही त्याच दाव्याची पुनरावृत्ती केली. राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, महिलांसाठी देण्यात आलेल्या १०,००० रुपयांच्या योजनांसाठी वापरलेली रक्कम मूळतः विकास प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून घेण्यात आलेली होती.
निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अमलबजावणीच्या अगदी एक तास आधी १४ हजार कोटी रुपये काढून १.२५ कोटी महिलांना हे पैसे वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी जनसुराज पक्षाने पत्रकार परिषदेत केली आहे.
निवडणुकीत पराभवानंतर प्रशांत किशोर राजकारण सोडणार का, या चर्चांनाही उदय सिंह यांनी उत्तर दिले. जनसुराज पक्ष पुढेही जनतेच्या प्रश्नांवर लढत राहील आणि पराभवामुळे पक्ष मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पण निवडणूक प्रक्रियेच्या नावाखाली राज्याच्या निधीचा होणारा गैरवापर अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------------------
