नाशिक : राज्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेलं गुन्हेगारीचं साम्राज्य उघडं पडत आहे. पुण्यातील भोंदूबाबाच्या प्रकरणाची धग अजून शांतही झाली नव्हती, तोच नाशिकमधून आणखी एक अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. “तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या कुटुंबातील कुणाचा तरी बळी जाईल” अशी खुलेआम धमकी देत एका भोंदूबाबाने महिलेला तब्बल 14 वर्षे लैंगिक अत्याचार सहन करायला लावल्याचं भीषण वास्तव उघड झालं आहे. जादूटोण्याच्या भीतीचं शस्त्र वापरत या भोंदूबाबाने केवळ अत्याचारच नाही तर पीडितेच्या कुटुंबाची तब्बल 50 लाख रुपयांची आर्थिक लूट केल्याचं समोर आलं आहे.
नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबाविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निफाड तालुक्यातील धारणगाव येथील गणेश जगताप हे या कथित भोंदूचं नाव असून, ग्रामीण भागात अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्याचं त्याचं हे अनेक वर्षांचं खेळ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. “तू मला आवडतेस… तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो” अशा विकृत मानसिकतेच्या धमक्या देत तो महिलेवर वर्षानुवर्षे दबाव आणत होता. इतकंच नाही, तर आपल्या पुस्तकात पीडितेच्या पती व मुलांची नावं लिहून ठेवत “संबंध ठेवले नाही तर या नावांपैकी एकाचा बळी जाईल” अशी अंधश्रद्धेच्या नावाखाली थेट जीवघेणी धमकी देत हा भोंदूबाबा तिच्यावर अत्याचार करत होता.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याने संताप आणखी वाढला आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाली की आरोपींना आधीच खबर कशी लागते, यावरून नागरिकांनी थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरळसरळ लोकांना लुबाडणारे, अत्याचार करणारे, अंधश्रद्धा पसरवणारे भोंदूबाबा राज्यात उघडपणे दहशत माजवत असताना प्रशासन मात्र हाताबाहेर जाते आहे का, असा सवाल जनतेतून केला जात आहे. पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले असले तरी हा भोंदूबाबा किती काळ मोकाट फिरणार, आणि अशा प्रकरणांकडे शासन गंभीरपणे लक्ष कधी देणार, याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
________________________________________
