प्रसिद्ध उर्दू शायर बशीर बद्र यांचे निधन झाले. प्रेम, माणुसकी आणि आयुष्यावर आधारित त्यांच्या गझलांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
मुंबई : प्रेम, विरह, माणुसकी आणि आयुष्याच्या भावविश्वाला शब्दांची अद्भुत किनार देणारे प्रसिद्ध उर्दू शायर डॉ. बशीर बद्र यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. आपल्या गझलांमधून त्यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होत असून उर्दू शायरीतील एक तेजस्वी पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
“उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो...” सारख्या ओळींनी लाखो हृदयांना स्पर्श करणारे बशीर बद्र आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. प्रेमाच्या नाजूक भावना, समाजातील ताणतणाव आणि मानवी नात्यांतील सूक्ष्म भावविश्व त्यांनी आपल्या लेखणीतून अत्यंत प्रभावीपणे मांडले.
बशीर बद्र यांच्या आयुष्यात अनेक विलक्षण योगायोग घडले. महाविद्यालयीन परीक्षेदरम्यान त्यांच्या स्वतःच्याच शेर चा अर्थ विचारण्यात आला होता. त्यांनी त्या शेर चे स्पष्टीकरण दिले असता परीक्षकांनी ते चुकीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तो शेर स्वतःचाच असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र इतक्या तरुण वयात एवढी गहन शायरी कोणी लिहू शकते यावर परीक्षकांचा विश्वास बसला नव्हता.
अत्यंत लहान वयात त्यांनी लेखनास सुरुवात केली होती. अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी पहिला शेर लिहिला. शालेय शिक्षणादरम्यानच त्यांच्या गझला साहित्यिक मासिकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे त्यांनी काही काळ पोलिस विभागात नोकरी केली, मात्र साहित्य आणि शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर १९६७ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णपणे साहित्य क्षेत्राला वाहून घेतले.
डॉ. बशीर बद्र यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून उर्दू विषयात पीएचडी मिळवली होती. विशेष म्हणजे त्यांनी १९७३ मध्ये प्रबंध सादर केला होता, मात्र दीक्षांत समारंभांना उपस्थित राहता न आल्याने त्यांनी मूळ पदवीच घेतली नव्हती. तब्बल ४७ वर्षांनंतर २०२१ मध्ये त्यांना त्यांच्या पीएचडीची पदवी अधिकृतपणे मिळाली.
१९८७ मधील मेरठ दंगलींमध्ये त्यांचे घर जाळण्यात आले होते. त्या घटनेने व्यथित होऊन त्यांनी लिहिलेला शेर आजही लोकांच्या स्मरणात आहे – “लोग टूट जाते हैं एक घर बनाने में...” हा शेर समाजातील विद्वेषावर तीव्र भाष्य करणारा ठरला.
उर्दू साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच साहित्य अकादमी पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. त्यांच्या अनेक गझला आणि शेर हिंदी चित्रपटांमधूनही लोकप्रिय झाले. ‘मसान’ चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या त्यांच्या ओळी नव्या पिढीपर्यंत पोहोचल्या.
बशीर बद्र यांच्या लेखणीने प्रेमाला शब्द दिले, तर वेदनांनाही सौंदर्य दिले. त्यांच्या जाण्याने उर्दू शायरीतील एक मोठा आवाज कायमचा शांत झाला असला तरी त्यांच्या ओळी आणि गझला पुढील अनेक पिढ्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.
_____