प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
मुंबई : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मानवी मनाची गुंतागुंत, मानसिक आजारांचे स्वरूप आणि त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आयुष्यभर काम केले. मानसिक आजार ही लपवून ठेवण्याची बाब नसून ती इतर शारीरिक आजारांप्रमाणेच सामान्य आहे, हा विचार त्यांनी आपल्या लेखन, व्याख्यान आणि उपचारांमधून समाजापर्यंत पोहोचवला. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्रासोबतच साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’ आणि ‘मयसभा’ यांसारख्या नाटकांनी रंगभूमीवर वेगळी छाप निर्माण केली. ‘गेट वेल सून’ या नाटकाच्या कथासंकल्पनेमुळेही त्यांना विशेष ओळख मिळाली होती.
१९८० साली एमबीबीएस आणि १९८४ मध्ये मनोविकारशास्त्रात एमडी पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मनोविकारांबाबत समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी स्वतंत्र चळवळ उभारण्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. त्यातूनच २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात Institute for Psychological Health अर्थात आयपीएच या संस्थेची स्थापना झाली.
आयपीएच संस्थेमार्फत केवळ मानसिक आजारांवर उपचारच नव्हे, तर समुपदेशन, व्यक्तिमत्व विकास, कौटुंबिक समस्या, तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य जनजागृती यांसारख्या विविध स्तरांवर काम करण्यात आले. साहित्य, संगीत, नाट्य, चित्रकला आणि संवाद यांसारख्या माध्यमांचा वापर करून मानसिक आरोग्य उपचार अधिक मानवी आणि सुलभ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ‘एका सायकिअॅट्रिस्टची डायरी’, ‘देवराईच्या सावलीत’, ‘मुक्तिपत्रे’, ‘मनोगती’, ‘स्वभाव-विभाव’, ‘शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट’ यांसारखी अनेक पुस्तके लिहिली. तसेच ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या साहित्याने मानसिक आरोग्य आणि मानवी भावविश्व सामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचवले.
मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांचे कार्य, संवेदनशील लेखन आणि सामाजिक बांधिलकी यामुळे डॉ. आनंद नाडकर्णी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे विचारवंत आणि जनमानसातील विश्वासार्ह मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक संवेदनशील आवाज कायमचा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
°°°°°