पाच दशकांनंतर उघडण्यात आलं बांके बिहारी मंदिराचं तळघर!

                                                    

आत काय सापडलं? सोन्या-चांदीच्या सळ्या, प्राचीन नाणी !

मथुरा: तब्बल ५४ वर्षांनंतर बांके बिहारी मंदिराचं तळघर रविवारी उघडण्यात आलं आणि या ऐतिहासिक घटनेने संपूर्ण मथुरेचे लक्ष वेधले. न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या आदेशानुसार हे तळघर निरीक्षणासाठी उघडण्यात आलं. १९७१ नंतर प्रथमच या तळघराचं दार उघडलं गेलं. दुपारी सुरू झालेल्या या प्रक्रियेत न्यायालयीन अधिकाऱ्यांची समिती, मंदिराचे पुजारी आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते.

गेल्या पाच दशकांपासून भाविकांमध्ये या तळघरात नेमकं काय आहे याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अनेकांच्या मते तळघरात ‘खजिना’ दडलेला आहे, अशा चर्चा सातत्याने सुरू होत्या. मात्र, दोन दिवस चाललेल्या निरीक्षण प्रक्रियेनंतर प्रत्यक्षात समोर आलेली माहिती या अफवांपासून काहीशी वेगळी ठरली आहे.

तळघर उघडण्याची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पडली. सर्वप्रथम दरवाजा कटरच्या साहाय्याने कापण्यात आला. त्यानंतर समितीचे सदस्य आत गेले आणि तळघरातील सर्व वस्तूंची यादी तयार करण्यात आली. आत प्रवेश करताच धूळ, माती आणि वाळवी लागलेल्या वस्तू दिसल्या. तळघरात काही साप देखील सापडल्याने वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवलं.

तळघरातील निरीक्षणात सोन्या-चांदीच्या सळ्या, शेकडो प्राचीन भांडी, तांब्याची व पितळेची नाणी आढळली आहेत. विशेष म्हणजे एका पेटीत चांदीच्या तीन सळ्या आणि गुलाल लावलेली एक सळी सापडली असून ती पूर्वी धार्मिक विधींमध्ये वापरली जात होती असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. काही दगड आणि जुनी पूजावस्तू देखील मिळाल्या आहेत.

समितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत तळघरातील सर्व वस्तूंची सविस्तर यादी तयार केली असून त्याचा अहवाल लवकरच न्यायालयाला सादर केला जाणार आहे. प्रशासन आणि मंदिर न्यासाने स्पष्ट केलं आहे की तळघरात मोठा खजिना सापडलेला नाही, मात्र सापडलेल्या वस्तूंना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बांके बिहारी मंदिर हे उत्तर प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र मानलं जातं. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे या तळघराच्या उघडण्याची प्रक्रिया ही केवळ प्रशासनिक कारवाई नसून भाविकांसाठी ऐतिहासिक आणि भावनिक क्षण ठरली आहे.

 #बांके बिहारी मंदिर, #मथुरा मंदिर तळघर, #Banke Bihari Mandir Mathura, #मथुरा खजिना, #सोन्याच्या सळ्या, #चांदीच्या सळ्या, #तांब्याची नाणी, #मंदिर निरीक्षण, #न्यायालयीन समिती, #धार्मिक वारसा, #Banke Bihari Temple Treasure.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने