रुपया डॉलरमागे ८७ पर्यंत मजबूत होण्याचा अंदाज !

 


[Bold] rupee recovery: डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयाच्या भवितव्याबाबत एसबीआय रिसर्चने मोठा अंदाज वर्तवला आहे. पुढील सहा महिने दबाव राहील, मात्र त्यानंतर रुपयात सुधारणा होऊन तो ८७ प्रति डॉलरपर्यंत मजबूत होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: डॉलरच्या तुलनेत सातत्याने कमजोर होत चाललेल्या भारतीय रुपयाबाबत चिंता वाढलेली असतानाच, एसबीआय रिसर्चने रुपयाच्या भवितव्यावर महत्त्वाचा दावा केला आहे. ‘इन रुपी वी ट्रस्ट’ या ताज्या अहवालात एसबीआयने म्हटले आहे की, भारतीय रुपया सध्या डीव्हॅल्युएशनच्या तिसऱ्या टप्प्यातून जात असून, या टप्प्यात रुपया आणि अमेरिकी डॉलर दोन्ही एकाच वेळी कमजोरीच्या अवस्थेत आहेत. मात्र, ही स्थिती कायम राहणार नाही आणि पुढील सहा महिन्यांनंतर रुपयात लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

एसबीआय रिसर्चच्या मते, सध्याची घसरण ही देशांतर्गत व्यापक आर्थिक तणाव, जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे यांमुळे होत आहे. मार्कोव रेजीम-स्विचिंग मॉडेलच्या आधारे करण्यात आलेल्या विश्लेषणात असे नमूद करण्यात आले आहे की, रुपया पुढील सुमारे सहा महिने दबावाखाली राहू शकतो. त्यानंतर मात्र रुपयात सुमारे ६.५ टक्क्यांची उसळी येण्याची शक्यता असून, २०२६ मध्ये तो पुन्हा डॉलरमागे ८७ रुपयांच्या पातळीच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

दरम्यान, भारतीय रुपयाने अलीकडेच ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली होती. मंगळवारी रुपया डॉलरमागे ९१ च्या पुढे गेला होता. मात्र त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जोरदार हस्तक्षेपामुळे परिस्थिती बदलली. बुधवारी रुपया ९०.३४७५ प्रति डॉलरवर व्यवहार करत होता, जो मागील बंद भावाच्या तुलनेत एक टक्क्यांहून अधिक मजबूत होता. १७ डिसेंबर रोजी रुपयात सात महिन्यांतील सर्वात मोठी एकदिवसीय तेजी नोंदवली गेली, ज्यामुळे डॉलरसमोरील दीर्घकाळ चाललेल्या घसरणीला तात्पुरता ब्रेक लागला.

एसबीआय रिसर्चने रुपयाच्या घसरणीमागील संरचनात्मक कारणांकडेही लक्ष वेधले आहे. २०१४ पूर्वीच्या तुलनेत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीत मोठी घट झाली आहे. २००७ ते २०१४ या काळात दरवर्षी सरासरी १६२.८ अब्ज डॉलरची निव्वळ गुंतवणूक होत होती, ज्यामुळे रुपयाला बळ मिळत होते. मात्र २०१५ ते २०२५ या कालावधीत ही सरासरी घसरून ८७.७ अब्ज डॉलरवर आली आहे. केवळ २०२५ मध्येच परदेशी गुंतवणूकदारांनी १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त भांडवल काढून घेतल्याने रुपयावर दबाव वाढला.

भू-राजकीय तणाव आणि टॅरिफ धोरणेही रुपयाच्या कमजोरीस कारणीभूत ठरत असल्याचे एसबीआयने नमूद केले आहे. टॅरिफ घोषणांनंतर रुपयात सुमारे ५.७ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. याशिवाय, जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे आयातदार आणि निर्यातदारांकडून डॉलरची हेजिंग वाढल्याने फॉरवर्ड मार्केटमध्ये डॉलरची मागणी प्रचंड वाढली आहे. जुलै २०२५ पासून व्यापारी बाजारात एकूण अतिरिक्त डॉलर मागणी १४५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्याने आरबीआयला हस्तक्षेप करावा लागला.

या सर्व नकारात्मक घटकांनंतरही एसबीआय रिसर्च रुपयाच्या भवितव्याबाबत सकारात्मक आहे. अहवालानुसार, सध्याचा दबावाचा टप्पा संपल्यानंतर ऐतिहासिक पद्धतीनुसार रुपयात जोरदार सुधारणा दिसून येते. भू-राजकीय जोखीम कमी होणे आणि भांडवली प्रवाह स्थिर होणे, या अटी पूर्ण झाल्यास २०२६ मध्ये रुपया सुमारे ६.५ टक्क्यांनी मजबूत होऊन डॉलरमागे ८७ च्या पातळीवर पोहोचू शकतो, असा विश्वास एसबीआय रिसर्चने व्यक्त केला आहे.


----------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने