वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई: बॉलिवूडमधील प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारे दिग्गज विनोदी अभिनेते असरानी (Asrani) यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या पाच दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अखंड विनोदी युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूरमध्ये झाला. त्यांनी सेंट झेविअर स्कूल, जयपूर येथे शिक्षण घेतलं आणि राजस्थान कॉलेजमधून पदवी संपादन केली. सुरुवातीला त्यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून करिअर सुरू केलं आणि नंतर चित्रपटसृष्टीकडे वळले. त्यांच्या पत्नीचं नाव मंजू बन्सल इरानी असून त्या देखील अभिनेत्री आहेत.
१९६० साली अभिनयाची सुरुवात केलेल्या असरानी यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांचं विनोदाचं अप्रतिम टायमिंग, संवादफेक आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक भाव यांमुळे ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागले. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रसिद्ध भूमिका म्हणजे ‘शोले’ (1975) चित्रपटातील “अंग्रेजों के ज़माने के जेलर” ही भूमिका. या पात्रामुळे असरानी भारतीय सिनेमात कायमचे अजरामर झाले.
‘खट्टा मीठा’, ‘चुपके चुपके’, ‘गुड्डी’, ‘अजनबी’, ‘अनुरोध’ यांसारख्या हिट चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत. ‘गुड्डी’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटाने त्यांना यश मिळवलं.
एका जुन्या मुलाखतीत असरानी यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना ते “व्यावसायिक अभिनेता” वाटत नव्हते, त्यात गुलजार यांचाही समावेश होता. पण अभिनयाच्या जोरावर त्यांनी सर्वांना आपला चाहता बनवलं. “एकदा अभिनयाची छाप पाडली की मागे वळून पाहायची वेळ आली नाही,” असं ते म्हणाले होते.
“१९७० च्या दशकात पुण्याच्या एफटीआयमधून हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या कलाकारांपैकी असरानी हे सर्वात सक्षम विनोदी अभिनेते होते. ऋषिकेश मुखर्जी यांसारख्या कल्पक दिग्दर्शकांचा विश्वास संपादन करणारा तो अभिनेता होता. असे त्यांच्यावर समीक्षक सांगतात.
असरानी यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले. त्यांनी ‘चला मुरारी हिरो बनने’, ‘सलाम मेमसाब’, ‘हम नहीं सुधरेंगे’, आणि ‘दिल ही तो है’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘दिल ही तो है’ मध्ये जॅकी श्रॉफचा डबल रोल होता, तर दिव्या भारती आणि शिल्पा शिरोडकर या अभिनेत्री मुख्य भूमिकेत होत्या. त्यांनी काही गुजराती चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आणि गेल्या दशकात मराठी चित्रपटांमध्येही काम केलं.
राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जीतेन्द्र, आणि ऋषिकेश मुखर्जी यांसारख्या आघाडीच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. ‘अजनबी’ आणि ‘अनुरोध’मध्ये राजेश खन्नांसोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.
असरानी यांचं निधन म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका विनोदी परंपरेचा अंत. ‘अंग्रेजों के ज़माने के जेलर’ या संवादासह असरानी कायमच चाहत्यांच्या स्मरणात राहतील.
# Asrani death news,#शोले जेलर असरानी, #हिंदी चित्रपटसृष्टी, #Bollywood comedian Asrani, #Govardhan Asrani, #Sholay jailer,#खट्टा मीठा, #चुपके चुपके, #Bollywood veteran actor dies.