महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट: 47 अधिकाऱ्यांना बढत्या;

                                                    

महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकार

मुंबई: राज्यातील महसूल विभागात दीर्घकाळ रखडलेल्या बढत्यांचा प्रश्न अखेर सुटला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर महसूल खात्यातील 47 वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढती देत महाराष्ट्राला 47 नवे अपर जिल्हाधिकारी (Additional Collector) मिळवून दिले आहेत. तब्बल 10 वर्षांपासून रखडलेल्या या बढत्या मंजूर करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी दिवाळीची मोठी भेट दिली आहे.

महसूल विभाग हा राज्य शासनातील सर्वात महत्त्वाचा आणि जनसंपर्कात राहणारा विभाग आहे.  मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात महसूलमंत्री बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, “महसूल विभाग हा जनतेच्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देणारा विभाग आहे. हा विभाग अधिक जनताभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.”

शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, सामान्य प्रशासन विभागाच्या 15 ऑक्टोबर 2025 च्या इतिवृत्तानुसार, आस्थापना मंडळ (क्रमांक 2) यांनी अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदांसाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी तयार केली होती. त्यानंतर या 47 अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. या पदांसाठीची वेतनश्रेणी S27-11,23,100 ते 2,15,900 रुपये अशी असणार आहे.

शासन आदेशानुसार, पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी 30 दिवसांच्या आत नव्या पदावर रुजू न झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. तसेच, रुजू झाल्याची माहिती revenue@maharashtra.gov.in या ई-मेलवर तात्काळ पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयातील सहकाऱ्यांसह फोटो शेअर करत म्हटलं, “हा विभाग अधिक बळकट व्हावा, कार्यक्षम व्हावा आणि राज्याच्या प्रगतीसाठी योगदान द्यावा, हा दीपोत्सव आपण सर्वांनी संकल्पपूर्वक साजरा करूया.”

या कार्यक्रमाला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एकूण 1,600 हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून महसूलमंत्र्यांनी विभागातील सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या बढत्यांमुळे राज्याच्या महसूल व्यवस्थेला नवी ऊर्जा मिळाली असून, प्रशासन अधिक गतिमान आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील, असा विश्वास महसूल मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 #महसूल विभाग, #Chandrashekhar Bawankule, #Maharashtra Revenue Department, #Additional Collector Promotion, #Government of Maharashtra, #Diwali Gift, #Revenue Officers, #महाराष्ट्र बातम्या, #शासन आदेश, #अपर जिल्हाधिकारी बढती.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने