Pm modi : भारत-यूएई संबंध; संरक्षण, ऊर्जा आणि शांततेवर पंतप्रधान मोदींचा भर !

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई दौऱ्यात भारत आणि यूएईदरम्यान रणनीतिक संरक्षण भागीदारी, ऊर्जा सहकार्य आणि पश्चिम आशियातील शांततेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

अबू धाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यात भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळाली असून संरक्षण, ऊर्जा, व्यापार आणि पश्चिम आशियातील शांतता या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन ज़ायेद अल नाहयान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा हा पहिला टप्पा असून त्यानंतर ते चार युरोपीय देशांच्या भेटीवर जाणार आहेत. अबू धाबी येथे पोहोचल्यानंतर काही वेळातच मोदी आणि अल नाहयान यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. यूएईचे राष्ट्राध्यक्ष स्वतः विमानतळावर उपस्थित राहून मोदी यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विमानाला यूएईच्या लष्करी लढाऊ विमानांनी विशेष एस्कॉर्ट दिला. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही प्रदान करण्यात आला.

बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी यूएईवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचे सांगताना त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीमधील जहाजवाहतूक सुरक्षित आणि अखंडित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. ऊर्जा आणि अन्नसुरक्षेसाठीही या मार्गाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही देशांनी  संरक्षण भागीदारीसाठी नव्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराअंतर्गत प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाचा संयुक्त विकास आणि सह-उत्पादन, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, दहशतवादविरोधी सहकार्य, सागरी सुरक्षा, सायबर संरक्षण तसेच सुरक्षित संवाद यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

दोन्ही नेत्यांनी भारत-यूएई संरक्षण सहकार्याला व्यापक रणनीतिक भागीदारीचा महत्त्वाचा स्तंभ मानले. संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक व्यापक करण्याबरोबरच संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावरही दोन्ही देश सहमत झाले आहेत.

मध्यपूर्व विषयांच्या अभ्यासकांच्या मते, या दौऱ्यात एलपीजी क्षेत्रासह अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीबाबतही चर्चा झाली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार १०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक असून यूएई हा गल्फ प्रदेशातील भारताचा सर्वात मोठा भागीदार असल्याचे त्यांनी नमूद केले. ईराणसोबतच्या संघर्षादरम्यान यूएईवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा दौरा यूएईला पाठिंबा दर्शवणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.

°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने