NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधील शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे. १० लाखांत पेपर खरेदी करून हरियाणात १५ लाखांत विक्री केल्याचा आरोप असून सीबीआयने तपास सुरू केला आहे.
नाशिक : NEET यूजी २०२६ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई केली असून नाशिकमधून शुभम खैरनार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. देशभरात NEET परीक्षा रद्द करण्याच्या मागण्या आणि विद्यार्थ्यांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुभम खैरनार हा बीएएमएसचा विद्यार्थी असून त्याच्यावर प्रश्नपत्रिका लीक करण्याचा आरोप आहे. तपासादरम्यान टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून पेपरफुटीचे जाळे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पुण्यात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
तपासात शुभम खैरनार याने NEET परीक्षेचा पेपर १० लाख रुपयांत विकत घेतल्याचे आणि नंतर तोच पेपर हरियाणातील एका व्यक्तीला १५ लाख रुपयांत विकल्याचे समोर आले आहे. या व्यवहारातून मोठ्या रॅकेटचा सुगावा लागल्याचे बोलले जात आहे.
सीबीआयच्या चार पथकांनी नाशिक क्राइम ब्रांच युनिट-२ कार्यालयात पोहोचून शुभम खैरनारला ताब्यात घेतले. यापूर्वी नाशिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. दरम्यान, एसओजीने १५० विद्यार्थी आणि ७० पालकांची यादी सीबीआयकडे सुपूर्द केली आहे. या सर्वांना कथितरित्या लीक झालेला ‘गेस पेपर’ पुरविण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
याशिवाय एसओजीच्या ताब्यात असलेल्या १३ एमबीबीएस समुपदेशकांनाही पुढील चौकशीसाठी सीबीआयच्या हवाली करण्यात आले आहे. NEET समुपदेशकांच्या माहितीनुसार, परीक्षेतील ६०० गुणांचे प्रश्न कथित गेस पेपरमध्ये आधीपासूनच उपलब्ध होते आणि हेच प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ६०० गुणांचा हा कट-ऑफ देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
दरम्यान, या प्रकरणात गुरुग्राममधून यश यादव नावाच्या युवकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान एसआयटी आणि गुरुग्राम गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. मात्र या रॅकेटमध्ये त्याची नेमकी भूमिका काय होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पेपरफुटी प्रकरणाच्या वाढत्या गांभीर्यामुळे सीबीआयने अधिकृत तपास सुरू केला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून मिळालेल्या लेखी तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ मे रोजी NEET यूजी परीक्षा घेतली होती. परीक्षेपूर्वीच काही गोपनीय कागदपत्रे आणि प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती बाहेर पसरल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या आरोपांमुळे देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआयने विशेष तपास पथके तयार करून देशातील विविध भागांत चौकशी सुरू केली असून, आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
°°°°°