Pm Modi : इंधन संकटाची भीती? पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरात चर्चांना उधाण !


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचत, सोने खरेदी टाळणे आणि विदेशी चलन वाचवण्याचे केलेले आवाहन चर्चेचा विषय ठरले आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधन संकटाची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल-डिझेलचा संयमाने वापर करण्याचे, एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि खाद्यतेलाचा कमी वापर करण्याचे केलेले आवाहन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. इराण आणि मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी विदेशी चलन वाचवण्यावर भर दिल्याने भारतात आगामी काळात गंभीर आर्थिक आणि इंधन संकट निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एका सार्वजनिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन करताना विदेशी चलन बचतीला देशभक्तीशी जोडले. “विदेशी मुद्रा वाचवणे ही आज देशभक्तीची गरज आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांना अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला. यामध्ये पेट्रोल-डिझेलचा कमी वापर, खाद्यतेलाची बचत, सोने खरेदी पुढे ढकलणे आणि विदेश प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले.

पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. अनेक भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन करत नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले. तर काही तज्ज्ञांनी यामागे जागतिक परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या आर्थिक दबावाचा इशारा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर टीका करत “केंद्र सरकारला भारताची ऊर्जा सुरक्षा कशी सुनिश्चित करायची हे अद्याप समजलेले नाही,” असा आरोप केला. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत, “ही आर्थिक आणीबाणीची चाहूल आहे का?” असा सवाल केला आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती वापरासाठी एलपीजीचा पुरवठाही नियमित सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मध्यपूर्वेतील परिस्थितीवर आंतरमंत्रालयीन बैठक घेण्यात आली. बैठकीनंतरही सरकारकडून देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, पंतप्रधानांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनामुळे नागरिकांमध्ये भविष्यातील आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढताना दिसत आहे.

मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र झाल्यास भारताच्या तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो, कारण भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलासाठी परदेशांवर अवलंबून आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर, महागाईवर आणि इंधन दरांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


___




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने