ओडिशातील जीतू मुंडा यांनी बहिणीच्या खात्यातील १९ हजार रुपये मिळवण्यासाठी तिचा सांगाडा घेऊन बँक गाठल्याची घटना देशभर गाजली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना १५ लाखांची मदत मिळाली.
ओडिशा : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका हृदयद्रावक व्हिडिओने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. आपल्या मृत बहिणीच्या खात्यातील केवळ १९ हजार रुपये काढण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीला तिचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जावे लागल्याची घटना समोर आली होती. या घटनेतील व्यक्तीचे नाव जीतू मुंडा असून ते ओडिशाचे रहिवासी आहेत. आता या घटनेनंतर देशभरातून उमटलेल्या सहानुभूतीमुळे जीतू मुंडा यांचे नशीब पालटले असून त्यांना तब्बल १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
माहितीनुसार, जीतू मुंडा यांच्या बहिणीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तिच्या बँक खात्यात जमा असलेले १९ हजार रुपये काढण्यासाठी जीतू बँकेत गेले होते. मात्र, त्यांना आवश्यक कागदपत्रांसह बहिणीला घेऊन येण्यास सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या उत्तरामुळे व्यथित झालेल्या जीतू यांनी चक्क बहिणीचा सांगाडा बाहेर काढला आणि तो खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटरचा प्रवास करत बँक गाठली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली.
व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी जीतू मुंडा यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये ‘फिजिक्स वाला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे यांनी सर्वाधिक १० लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच राजस्थानचे कृषी मंत्र्यांनीही आपला एका महिन्याचा पगार, म्हणजेच सुमारे १.४५ लाख रुपये जीतू यांना मदत म्हणून दिले आहेत. विविध स्तरातून मिळालेल्या मदतीमुळे आतापर्यंत जवळपास १५ लाख रुपयांची रक्कम जीतू मुंडा यांच्याकडे जमा झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी फक्त आवश्यक कागदपत्रे आणण्यास सांगितले होते, सांगाडा आणण्यास नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. मात्र जीतू मुंडा आपल्या भूमिकेवर ठाम असून, “बहिणीला घेऊन या,” असे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आल्यामुळेच आपण हे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या घटनेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना अजूनही शासकीय आणि बँकिंग प्रक्रियेत कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एका भावाने बहिणीच्या पैशांसाठी केलेला हा संघर्ष देशाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे.
°°°°°
