इबोलाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर दुबई आणि बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशांची ताप तपासणी, स्वयंघोषणा अर्ज आणि विलगीकरणाची तयारी करण्यात आली आहे.
पुणे : इबोलाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन सतर्क झाले असून दुबई आणि बँकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांकडून स्वयंघोषणा अर्ज भरून घेतला जात असून ताप तपासणीसह आवश्यकतेनुसार विलगीकरणाची तयारीही करण्यात आली आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पुणे विमानतळावर इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने इबोला साथीला ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत.
पुणे विमानतळ प्राधिकरण, विमानतळ आरोग्य संघटना आणि जलद प्रतिसाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विमानतळ परिसरात इबोला रोगाविषयी जनजागृती करणारी माहितीपत्रके आणि मार्गदर्शक सूचना लावण्यात आल्या आहेत.
प्रवाशांना स्वयंघोषणा अर्जात अचूक माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ताप, अशक्तपणा, उलटी, रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे तसेच अलीकडील परदेश प्रवास किंवा संपर्काचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सध्या पश्चिम आफ्रिकेतील काँगो आणि युगांडा येथे इबोला विषाणूच्या बुंदिबुग्यो स्ट्रेनमुळे व्हायरल हॅमोरेजिक फीव्हर अर्थात रक्तस्रावी तापाची गंभीर साथ पसरली आहे. या आजाराचा मृत्यूदर अत्यंत जास्त असल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या या विषाणूवर प्रभावी लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नसल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरच भर दिला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, काँगोमधील तीन प्रांतांमध्ये ८६७ संशयित रुग्णांपैकी २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१४ ते २०१६ या काळातील पश्चिम आफ्रिकेतील साथी नंतरचा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्रेक मानला जात आहे. त्यामुळे काँगो आणि युगांडाला लागून असलेल्या दक्षिण सुदानसह इतर शेजारील देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
°°°°°