डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने !

 


दिल्लीतील अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या २५०व्या सोहळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्लीमध्ये आयोजित अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या २५०व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. थेट व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमात सहभागी होत ट्रम्प यांनी मोदी हे आपले जवळचे मित्र असल्याचे सांगितले तसेच भारत आणि अमेरिका यांचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचे मत व्यक्त केले.

दिल्लीतील या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सेर्जिओ गोर उपस्थित होते. ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सेर्जिओ गोर यांनी कार्यक्रमादरम्यान थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लाईव्ह व्हिडिओ कॉलद्वारे जोडत उपस्थितांना मोठे सरप्राइज दिले. यावेळी ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विशेष भावना व्यक्त केल्या.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मला पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप आवडतात. ते अत्यंत चांगले व्यक्तिमत्त्व असून ते माझे मित्र आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आजवर इतके मजबूत कधीच नव्हते. दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्य सातत्याने अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारताला मदतीचा संदेश देताना ट्रम्प यांनी म्हटले की, “भारताला कधीही मदतीची गरज भासली तर त्यांना कोणाला फोन करायचा हे माहिती आहे आणि त्याचे उत्तर म्हणजे अमेरिका.” भारत अमेरिका आणि स्वतः ट्रम्प यांच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परदेशातील एखाद्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थेट सहभागी होऊन दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांचे इतक्या खुल्या शब्दांत कौतुक करणे हे दुर्मीळ मानले जाते. त्यामुळे ट्रम्प यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे. या प्रसंगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक मैत्री तसेच भारत-अमेरिका संबंधांची वाढती जवळीक अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.

°°°°°




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने