छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड किल्ल्यावर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या पवित्र स्थळी काही बेजबाबदार पर्यटकांकडून मद्यधुंद पार्ट्या केल्या जात असल्याचे उघड झाले असून गड परिसरात तब्बल ५० हून अधिक दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रायगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र या गर्दीत काही हुल्लडबाजांकडून गडाच्या पावित्र्याला धक्का पोहोचवणारे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. गडावरील एमटीडीसीच्या निवासस्थानांच्या परिसरात तसेच ‘राणी वसा’च्या मागील भागात मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा आणि अस्वच्छता आढळून आली. गड दर्शनासाठी आलेल्या अनेक सुजाण पर्यटकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींच्या मते, गडावरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत अपुरी असल्यामुळेच असे प्रकार वाढत आहेत. रायगडाच्या प्रवेशद्वारांवर पर्यटकांच्या सामानाची प्रभावी तपासणी होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच निष्काळजीपणाचा फायदा घेत काही जण गडावर सहजपणे मद्याच्या बाटल्या घेऊन जात असल्याचा दावा शिवप्रेमींनी केला आहे.
या प्रकारानंतर भारतीय पुरातत्व विभाग आणि संबंधित प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. स्वराज्याच्या राजधानीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता गडावरील शिस्त आणि पावित्र्य राखण्यासाठी पुरेशा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल संतप्त शिवभक्तांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर गडप्रेमी आणि स्थानिकांकडून प्रशासनाकडे अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. रायगडावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी करण्यात यावी, गडावरील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, मुख्य ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि दारूबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
इतिहास आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या रायगड किल्ल्यावर घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आता याप्रकरणी कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
°°°°°
