पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी महिलेला १५ दिवस घरात कोंडून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : उरुळी कांचन परिसरात मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी अत्यंत अमानुष घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच ‘मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून एका पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीवर क्रूर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आरोपीने पत्नीला बेदम मारहाण करत तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याचा गंभीर आरोप असून, या घटनेनंतर जखमी अवस्थेत तिला तब्बल १५ दिवस घरातच डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २० एप्रिल रोजी घडली. आरोपी पती दारूच्या नशेत घरी आल्यानंतर त्याने पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय घेत शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. “तू कामावर जातेस, बाहेर कोणाशी संबंध आहेत ते सांग,” असे म्हणत त्याने पत्नीला धमकावले. त्यानंतर आरोपीने ॲसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
असह्य वेदनांनी विव्हळलेल्या पीडितेने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने दरवाजा आतून बंद करून तिला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या तिच्या जावेने सासू-सासऱ्यांना फोन करून माहिती दिली. मात्र त्यापूर्वीच आरोपीने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत तेथून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतरही जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले नाही. उलट आरोपीने तिला घरातच डांबून ठेवल्याचा आरोप आहे. अखेर पती कामावर गेल्याची संधी साधून पीडितेने आपल्या दोन मुलींना सोबत घेत माहेर गाठले. तेथे तिने संपूर्ण प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तिला उरुळी कांचन पोलिस ठाण्यात नेले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर महिलेने १५ मे रोजी अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली. सध्या आरोपीचा शोध सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आणि चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर करण्यात आलेल्या या अमानुष अत्याचारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जखमी अवस्थेत महिलेला १५ दिवस घरातच कैद करून ठेवण्यात आल्याने आरोपीच्या क्रौर्याची परिसीमा समोर आली आहे.
दरम्यान, पीडित महिलेने मोठ्या धैर्याने अत्याचारातून बाहेर पडत पोलिसांत धाव घेतल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
°°°°°
