देशात अवघ्या ४८ तासांत सोने-चांदी, दूध, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे महागाईचा मोठा फटका बसला आहे. इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.
नवी दिल्ली : देशातील नागरिकांना गेल्या ४८ तासांत महागाईचे सलग चार मोठे धक्के बसले आहेत. सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ, दूध दरवाढ, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ आणि त्यानंतर सीएनजी दरवाढ अशा घटनांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महागाईचा पहिला मोठा फटका सोने-चांदी बाजारात बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलन बचतीसाठी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्कात वाढ केली. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारासह एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. अहवालानुसार, सोने सुमारे ११ हजार रुपयांनी तर चांदी तब्बल २२ हजार रुपयांनी महाग झाली.
यानंतर दूध दरवाढीमुळे ग्राहकांना दुसरा मोठा धक्का बसला. Amul आणि Mother Dairy यांनी पॅकेज्ड दुधाच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली. नवीन दर १४ मेपासून लागू करण्यात आले असून त्यामुळे घरगुती खर्चात वाढ होणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांवर या दरवाढीचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
दूधानंतर इंधन दरवाढीने नागरिकांची चिंता आणखी वाढवली. १५ मेपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर सुमारे तीन रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९७.७७ रुपये प्रति लिटर झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल १०८.७४ रुपये, मुंबईत १०६.६८ रुपये तर चेन्नईत १०३.६७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
डिझेलच्या दरातही वाढ करण्यात आली असून दिल्लीमध्ये डिझेल ९०.६७ रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकात्यात ९५.१३ रुपये, मुंबईत ९३.१४ रुपये आणि चेन्नईत ९५.२५ रुपये प्रति लिटर असा दर लागू झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधन दरांवर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
महागाईचा चौथा फटका सीएनजी ग्राहकांना बसला आहे. मुंबईनंतर आता दिल्लीतही सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. १५ मेपासून दिल्लीमध्ये सीएनजी दोन रुपयांनी महाग झाली असून नवीन दर ७९.०९ रुपये प्रति किलो झाला आहे. मुंबईत एक दिवस आधीच सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि तेथील दर ८४ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
सोने, दूध, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांतील दरवाढीमुळे महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या किमतींमुळे वाहतूक खर्च, अन्नधान्य वितरण आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू शकतात, अशी भीती अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
°°°°°