वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्या डिनरदरम्यान गोळीबाराची घटना; संशयित अटकेत, सीक्रेट सर्व्हिसची तत्पर कारवाई, सुरक्षा त्रुटींवर प्रश्न उपस्थित.
वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे आयोजित व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनरदरम्यान अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू असताना काही क्षणांतच वातावरण दहशतीत बदलले. सुमारे २३०० हून अधिक मान्यवर उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात रात्री साडेआठच्या सुमारास अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती शस्त्रसज्ज अवस्थेत हॉटेलच्या लॉबीमध्ये दाखल झाला आणि डिनर हॉलच्या दिशेने पुढे सरकू लागला. त्याच्याकडे शॉटगन, हँडगन आणि धारदार शस्त्रे होती. सुरक्षा घेरा भेदण्याचा प्रयत्न करत त्याने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. तपासात उघड झाले की संबंधित संशयित हा हॉटेलमधीलच पाहुणा होता. त्यामुळे प्रारंभीच्या तपासणीतून तो सुटला आणि आतपर्यंत पोहोचू शकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय कोल टोमस एलन हा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून तो त्या हॉटेलमध्ये मुक्कामी होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सुरक्षा अडथळे ओलांडून पुढे जाताना दिसून आला आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली.
गोळीबाराचा आवाज येताच डिनर हॉलमध्ये उपस्थित नागरिकांनी आश्रय घेण्यास सुरुवात केली. काही जण टेबलखाली लपले तर काहींनी जमिनीवर आडवे होत स्वतःचे संरक्षण केले. त्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंचावर उपस्थित होते. यूएस सीक्रेट सर्व्हिसने तत्काळ कारवाई करत ट्रम्प यांना सुरक्षित वर्तुळात घेतले आणि काही क्षणांतच त्यांना तसेच उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. यावेळी मेलानिया ट्रम्प यांनाही सुरक्षेच्या कवचात बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संशयित व्यक्तीने बॉलरूमकडे जाण्याचा प्रयत्न करत एका सुरक्षा अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याचे दिसून आले आहे. संबंधित अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले असल्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला एकट्याने केला असून आरोपीविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेने हॉटेलमधील मल्टी-लेयर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हॉटेलच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा असूनही संशयित लॉबीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरल्याने सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी अनेक स्तरांवर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. प्रवेशासाठी मेटल डिटेक्टर, ओळख पडताळणी आणि विशेष पासची तपासणी करण्यात येत होती. तरीही हॉटेलमध्ये सामान्य पाहुण्यांची ये-जा सुरू असल्याने लॉबी परिसरात तुलनेने कमी कडक सुरक्षा असल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेचे कौतुक करत त्यांनी वेगाने आणि धाडसाने परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले. तपास यंत्रणा सध्या घटनास्थळावरील पुरावे, शस्त्रे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील चौकशी करत आहेत. हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
विशेष म्हणजे, याच वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये १९८१ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले होते. मात्र, अनेक दशकांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
°°°°°
