‘ऑपरेशन लोटस’वर आरोप; ‘आप’मधील फुटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले, पक्षांतरावर संताप वाढला; अण्णा हजारेंनंतर संजय सिंह यांचीही तीव्र टीका,
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील मोठ्या फुटीनंतर पक्षांतराच्या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर आता संजय सिंह यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून खालच्या दर्जाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी पंजाबमधील जनतेच्या भावनांचा विश्वासघात झाल्याचे म्हटले आहे.
संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधत, आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार फोडून भाजपमध्ये सामील केल्याचा आरोप केला. पंजाबमधील भगवंत मान यांच्या सरकारला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. पंजाबच्या जनतेने या खासदारांना राज्यसभेत पाठवले, मात्र त्यांनी भाजपमध्ये जाऊन जनतेचा विश्वासघात केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंजाबची जनता या पक्षांतर करणाऱ्या खासदारांना कधीही माफ करणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी या सात नावांना लोकांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन केले. संदीप पाठक यांना देखील पंजाबच्या जनतेच्या पाठिंब्यामुळे राज्यसभेत जाता आले, मात्र आता त्यांचा निर्णय जनतेच्या भावनांना धक्का देणारा असल्याचे त्यांनी म्हटले.
याचवेळी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत संजय सिंह यांनी इलेक्टोरल बाँड प्रकरणाचा उल्लेख केला. देशातील सर्वात भ्रष्ट पक्षात सामील होत भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचा दावा करणाऱ्यांवर जनतेचा विश्वास बसेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या सर्व घडामोडींची पार्श्वभूमी म्हणजे आम आदमी पक्ष मधील मोठी फूट. राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या सोबत स्वाती मालीवाल, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, बलबीर सिंग सीचेवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी यांनीही पक्ष सोडला आहे.
या घटनेमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून एकीकडे अण्णा हजारेंनी पक्षांतरावर कायदा करण्याची मागणी केली असताना दुसरीकडे संजय सिंह यांनी थेट भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय संघर्ष अधिक तीव्र केला आहे. पंजाबमधील जनतेवर झालेल्या या कथित ‘विश्वासघाताचे’ उत्तर आगामी काळात मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
°°°°°
